
- डॉ. श्री. दे. नाईक
कोणत्याही मातेच्या चाळीस आठवडय़ांच्या गर्भारपणाच्या काळात उदरातील गर्भाचं भरणपोषण हे मातेच्या आहारातून होत असतं. ते वाढत्या गर्भाला व्यवस्थितपणे मिळत राहावं यासाठी निसर्गतःच ‘वार’ आणि नाळ या तात्पुरत्या अवयवांची निर्मिती केली जाते.
आपल्या सभोवतालाविषयीचे सांस्कृतिक बंध किती घट्ट आहेत हे सांगताना ‘माझी नाळ या मातीशी जुळलेली आहे’ असे आलंकारिक भाषेत म्हटलं जातं. ते इतकं योग्य आहे की, आपलं जीवनातलं पहिलंवहिलं पोषण करते ती गर्भाला आणि मातेला जोडणारी नाळच. आपलं जन्मापूर्वीची अस्तित्वच या नाळेवर अवलंबून असतं.
कोणत्याही मातेच्या चाळीस आठवडय़ांच्या गर्भारपणाच्या काळात उदरातील गर्भाचं भरणपोषण हे मातेच्या आहारातून होत असतं. ते वाढत्या गर्भाला व्यवस्थितपणे मिळत राहावं यासाठी निसर्गतःच ‘वार’ नावाच्या तात्पुरत्या अवयवाची निर्मिती केली जाते. गर्भाचे रक्षण, पोषण आणि त्याला संजीवक प्राणवायू पुरवण्याचं आणि अनावश्यक पदार्थ बाहेर टाकण्याचं कार्यही ही ‘वार’ करते. हे सर्व काम पार पडत असताना वार आणि अर्भकाला जोडणारा दुवा असते ती नाळ! विशिष्ट कालांतराने जन्माला येणाऱया बाळाच्या गर्भावस्थेतील जीवनाची मजबूत दोरी म्हणजे नाळ असंही म्हणता येईल.
मातेच्या गर्भाशयातील अंतःस्तर किंवा एण्डोमेट्रियम आणि गर्भाच्या बाहेरील विशिष्ट कोशिकांचे आवरण म्हणजे सिन्सियोट्रोफोब्लास्ट यांची ‘हस्तांदोलन’ झाल्यासारखी घट्ट ‘मैत्री’ जुळते आणि पुढील चाळीस आठवडय़ांची मार्गक्रमणा विनासायास होत राहते. अतिशय सूत्रबद्ध नियोजनातून हा गर्भप्रवास घडत असतो. यामध्ये वार आणि नाळ यांचं स्थान अनिवार्य ठरतं. मातृउदरात गर्भाची स्थापना झाल्यापासून तिसऱयाच आठवडय़ात ‘वारे’ची निर्मिती होऊ लागते. कोणाच्याही जन्मापूर्वीचा हा ‘जैव-संकेत’ एका व्यक्तीच्या जन्माला बळ देत असतो. आपल्या कोणाच्याही जन्मापूर्वी घडणाऱया या गोष्टी खरोखर इतक्या विस्मयकारी आहेत की, वैद्यक शास्त्र्ााला त्यामागचं सत्य ठाऊक असलं तरी आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. पूर्णतया विकसित झालेली ‘वार’ 500 ग्रॅम वजनाची आणि एखाद्या बशीसारखी दिसते. ‘वारे’चा व्यास 12 ते 20 सेंटिमीटर असतो.
‘वारे’लाच जोडणारी ‘नाळ’ सुमारे 40 ते 50 सेंटिमीटर लांब आणि 15 सेंटिमीटर जाडीची असते. गर्भाला सर्व प्रकारची रसद पुरवून त्याचं आरोग्य अबाधित राखणारी नाळ ही खरोखरच जीवनवाहिनी! ही आयुष्याची अक्षरशः दोरी ठरणारी नाळ स्वतः मात्र अवघ्या चाळीस आठवडय़ांचं अल्पायुष्य घेऊन येते. कारण बाळाच्या जन्मानंतर नाळेचं कार्यच संपते. ती दूर करावीच लागते. तोपर्यंत मात्र आई आणि अर्भकाच्या रक्तातील पदार्थांची देवाणघेवाण नाळेच्या सहाय्यानेच होते. दोघांचे रक्तप्रवाह जवळून वाहत असताना मध्ये केवळ एक तलम पापुद्रा असतो. त्यातून गर्भाला पोषक आहे तेवढं आईकडून घेणे आणि अनावश्यक ते टाकून देणे अशी दुहेरी जबाबदारी ‘वार’ पार पाडते.
गर्भाशयात बाळाची वाढ होण्याच्या चाळीस आठवडय़ांच्या काळात त्याची फुप्फुसं कार्यान्वित झालेली नसतात. शिवाय, बाळ गर्भाशयातील गर्भजलात पहुडलेलं असतं. मग बाळाच्या वाढीसाठी जीवनावश्यक प्राणवायू कसा मिळणार? आईच्या रक्तातील प्राणवायू बाळापर्यंत पोचवण्याचं हे मोलाचं काम ‘वारे’मार्फत होतं. त्याप्रमाणेच अर्भकाला अन्नघटकही वारेकडूनच मिळत राहतात. म्हणूनच गर्भाची वाढ उत्तम रीतीने होण्यासाठी गर्भात मातेने सकस आणि चौरस आहार घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. गर्भावस्थेतील बाळाच्या चयापचय प्रक्रियेतून मल, मूत्र आणि इतर जे अनावश्यक घटक तयार होतात, तेसुद्धा मातेच्या बाळाच्या रक्ताभिसरणातील देवाणघेवाण प्रक्रियेतूनच बाहेर टाकले जातात. त्यासाठी ‘वार’ एखाद्या फिल्टरसारखं काम करते. शरीराला घातक ठरणारी रसायनं किंवा औषधंही गर्भाच्या वाढीत बाधा आणू शकतात, पण तसं होऊ नये याची आटोकाट काळजी ‘वारे’कडून घेतली जाते.





























































