डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या सूत्रधारांना पकडणार कधी? अंनिसचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज सात वर्षे पूर्ण झाली. त्यापार्श्वभूमीवर अंनिसच्यावतीने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर आज सकाळी डॉ. दाभोलकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. खुनाच्या सूत्रधारांना कधी पकडणार आणि न्याय कधी मिळणार, असा सवाल करत ’जवाब दो’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

महाराष्ट्र अनिंसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, पुणे शाखेचे अध्यक्ष श्रीपाल ललवाणी, राहुल माने तसेच मोजके कार्यकर्ते उपस्थित होते. दाभोलकर यांची प्रतिमा आणि फलक हातात घेऊन पावसात निदर्शने करण्यात आली.

दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या खुनांचे एकमेकांत गुंतलेले धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले आहेत. गुन्ह्यांमधील काही संशयित आरोपी समान आहेत तसेच दोन समान शस्त्रे या चार खुनांमध्ये वापरलेली आहेत. तरीही सूत्रधार अद्याप मोकाट का, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला.

यावेळी ’फुले- शाहू- आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर’ असा नारा देण्यात आला. करोनामुळे मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि सुरक्षित अंतर ठेवून निदर्शने करण्यात आली. सीबीआय या देशातील प्रतिष्ठित तपास यंत्रणेकडून खुनाचा तपास पूर्ण झालेला नाही, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. खुनामागील सूत्रधार कोण आहेत हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे. अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही,’ अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.