महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, डॉ. निलम गोऱ्हे यांची पोलिसांना सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलांच्या सुरक्षिततेला राज्य शासन सर्वोच्च प्राधान्य देत आहे. मात्र, काही ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन, महिला दक्षता समिती तसेच महिलांच्या प्रश्नासंदर्भात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केले आहे.

शासकीय विश्रामगृहात महिला सुरक्षेबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.

गोऱ्हे म्हणाल्या, निमर्नुष्य ठिकाणी सीसीटीव्ही संख्या वाढविणे, गस्त वाढविणे, वारंवार घटना घडणाऱ्या ठिकाणी पथदिव्यांची सोय करणे गरजेचे आहे. महिला सुरक्षिततेच्यादृष्टीने प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. त्याशिवाय पॉक्सो कायद्याअंतर्गत प्रलंबित केसेस तत्काळ निकाली काढण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. विधी व न्याय विभागाच्या संदर्भातील प्रलंबित प्रश्नाबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरात सार्वजनिक प्रवास करताला महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी यंत्रणा सतर्क ठेवावी. तसेच रेल्वे पोलीस, राज्य पोलीस दल यांनीही सीसीटीव्ही संख्या वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. महिलांच्या तक्रारी लवकर समज़ुन माहिती होण्यास व्हाट्सअप ग्रुप करणे, सामाजिक संघटनांचा पोलिसांच्या तपासात, पीडितांच्या समुपदेशनात सहभाग वाढविण्याबाबत सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. भरोसा सेल सक्षमीकरण, महिलांसाठी मदत गटांची स्थापना, समुपदेश, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल वेळेत मिळविण्यासाठी सबंधित यंत्रणेने विशेष प्रयत्न करण्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

महिला सुरक्षिततेसाठी प्राधान्य-अधिकाऱ्यांची भूमिका

पुणे शहरासह ग्रामीण भागात आणि पिंपरी -चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत महिलांच्या सुरक्षिततेला विशेष प्राधान्य देण्यात आल्याचे पुणे पोलीस आयुक्त गुप्ता, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. त्याशिवाय आपआपल्या हद्दीत महिला सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजनांची माहिती त्यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांना दिली.