कोरोनाची अनाठायी भीती नको, पण खबरदारी हवी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा दुसरा स्ट्रेन अधिक वेगाने रुग्णांमध्ये पसरतो आहे. हा स्ट्रेनमुळे आढळणारी लक्षणे आणि त्याला सामोरे जाताना काय खबरदारी घ्यावी याबाबत राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी केलेली बातचीत.

कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये रुग्णांमध्ये कोणती लक्षणे आढळत आहेत?

– ताप, सर्दी, अंगदुखी, घशात खवखव, वास न येणे, थकवा, धाप लागणे ही या आजाराची सर्वसामान्य लक्षणे आहेत. काही वेळा उलटी, जुलाब अशी वेगळी लक्षणेही आढळतात. ही लक्षणे आढळली तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. रात्री झोप झाली नाही, काल काही तरी तेलकट खाण्यात आले म्हणून असे होत असेल असे म्हणून लक्षणे अंगावर काढू नका. डॉक्टर किंवा आरोग्य पेंद्रात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्या.

आजाराची जोखीम कुणाला जास्त आहे?

– ज्यांचे वय 50 पेक्षा अधिक आहे, ज्यांना मधुमेह-उच्च रक्तदाब असे आजार किंवा लिव्हर, किडनीचे आजार आहेत, ज्यांचे वजन जास्त आहे अशा व्यक्तींमध्ये कोरोना आजाराची गुंतागुंत अधिक प्रमाणात होते. त्यामुळे अशा व्यक्तींनी कोरोनाची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.

घरच्या घरी रुग्णांची काळजी कशी घ्यावी?

– घरात वृद्ध, लहान मुले, गरोदर महिला, जोखमीचे आजार असणाऱया व्यक्ती असतील तर त्यांच्याशी संपर्क टाळणे अधिक महत्त्वाचे आहे. रुग्णाने आणि रुग्णाची काळजी घेणाऱया व्यक्तीने ट्रिपल लेयर सर्जिकल मास्क वापरावा. घरातील निश्चित अशा एकाच व्यक्तीने रुग्णाची नियमित काळजी घ्यावी. काळजीवाहू व्यक्तीने आपल्या हाताची स्वच्छता जपली पाहिजे. काळजीवाहू व्यक्तीने घरातील वस्तू, पृष्ठभाग नियमित स्वच्छ करावेत. रुग्णाचे कपडे, प्लेट्स आणि इतर गोष्टी शेअर करू नयेत.