माझ्यासारख्यांची पक्षाला गरज उरली नाहीये! भाजपच्या नेत्याचा राजीनामा

मध्य प्रदेशात आगामी निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये पळापळ सुरू झाली आहे. सोमवारी भाजपने 39 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यातील उमेदवारांची नावे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही दुसरी यादी जाहीर होताच काही तासांत भाजपचे मध्य प्रदेशातील मोठे नेते डॉ. राजेश मिश्र यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाला आपली गरज उरलेली नाही, मला पक्षावर ओझं बनून जगायचे नाहीये असं म्हणत त्यांनी राजीनामा दिला आहे. तिकीट वाटपामध्ये आपल्याला संधी न मिळाल्याने मिश्र हे नाराज होते.

मिश्र हे पूर्वी सीधी जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष होते. मध्य प्रदेश भाजप कार्य समितीचे ते सदस्यही होते. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. सीधी मतदारसंघातून तिकीट मिळावे यासाठी मिश्र आग्रही होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती.

भाजपने सोमवारी 39 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यामध्ये केंद्रीयमंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हाद पटेल, फग्गनसलिंह कुलस्ते यांचीही नावे होती. भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनाही भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली असून यादीत नाव पाहून त्यांनाही धक्का बसला आहे. भाजपने 3 केंद्रीय मंत्र्यांसह 7 खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने दुसऱ्या यादीत ज्या 39 मतदारसंघांसाठीचे उमेदवार दिले आहेत. त्यातील 39 जागांवर 2018 च्या निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता.