
वैधमापन शास्त्र नियंत्रक डॉ. रवींद्र सिंगल यांनी पुणे ते गोवा डेक्कन क्लिफ हँगर या 643 किलोमीटरच्या सायकलिंगच्या शर्यतीत भाग घेतला. वयाच्या पन्नाशीत ही शर्यत पूर्ण करणाऱया सिंगल यांचा हा सायकल प्रवास प्रवास पुस्तकरूपात प्रसिद्ध झाला असून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. सिंगल यांनी 2017 मध्ये पुणे ते गोवा डेक्कन क्लिफ हँगर या 643 किलोमीटरच्या सायकलिंगच्या शर्यतीमध्ये भाग घेतला होता. सदरची शर्यत ही अतिशय खडतर होती तसेच विशिष्ट कालमर्यादेत ती पूर्ण करणे अतिशय आवश्यक होते. त्याकरिता मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती सुदृढ तसेच सराव क्रमप्राप्त होते. याकरिता डॉ. सिंगल यांनी 6 महिने प्रशिक्षण घेतले. त्यांनी 4 नोव्हेंबर, 2017 रोजी प्रत्यक्षात सदर शर्यतीत भाग घेतला. त्यांच्याबरोबर इतर काही प्रतिस्पर्धी होते, परंतु मानसिक व शारिरीक थकव्यामुळे काहींनी सदरील शर्यत मधेच सोडून दिली. तथापि, डॉ. सिंगल यांनी मानसिक तयारी असल्याने ही शर्यत वयाच्या पन्नाशीतही पूर्ण केली. तरुणांचे मनोधैर्य व मनोबल उंचावण्याकरिता नक्कीच प्रेरणादायी ठरावा म्हणून डॉ. सिंगल यांनी हे पुस्तक लिहिले. डॉ. वैशाली बालाजीवाले या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. पुस्तक प्रकाशन प्रसंगी कामगार प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यादेखील उपस्थित होत्या.

































































