मुद्दा – सणवार आणि कोरोनाचा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशचतुर्थी, दसरा, ओणम आणि असे सण आता रांगेने येणार आहेत. सणासुदीचे हे दिवस आपल्या सगळ्यांसाठीच खास असतात. कारण यावेळी सगळे कुटुंबीय एकत्र जमतात. सणांचे हे महत्त्व आपण अर्थातच जाणतो, पण त्याच वेळी कोविड-19 या विषाणूचा प्रसार नियंत्रणात राहावा आणि संक्रमणाचा दर कमीत कमी असावा यासाठी खबरदारी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

यासाठी प्रत्येकानेच आपले सण घरापुरतेच मर्यादित ठेवायला हवेत आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे. गर्दीच्या ठिकाणी जावे लागलेच तर न चुकता मास्क घातला पाहिजे आणि आपले हात शक्य तितके सॅनिटाइझ करायला हवेत. या छोटय़ा छोटय़ा गोष्टी, विशेषतः व्यक्तिगत पातळीवर पाळल्यास आपण विषाणू व त्याच्या व्हेरिएंट्सच्या बाधेपासून अनेकांना खूप चांगल्या प्रकारे सुरक्षित ठेवू शकतो.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सणासुदीच्या काळात आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने लस टोचून घेतली आहे याची खातरजमा करायला हवी. कोविड-19 ची लस कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यू रोखण्याच्या बाबतीत परिणामकारक ठरली आहे हे आता सिद्ध झाले आहे, त्यामुळे प्रत्येकाने या लसीचे बूस्टर डोस घ्यायला हवेत. एकदा का लस घेतली की, त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती बळकट होते आणि शरीर अधिक विषाणूंना परतवून लावण्यासाठी सज्ज होते. त्याच वेळी एखादी व्यक्ती जेव्हा लस घेते तेव्हा आपल्या अवती भोवतीच्या व्यक्तींना संरक्षण देण्याच्या कामीही ती महत्त्वाची भूमिका बजावते.

आपली आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, नर्स आणि पालिका यंत्रणा कोविडच्या संकटाचा सामना करण्यासाठी सुसज्ज आहेत. मात्र आपणही वर उल्लेखलेल्या साध्या उपाययोजना केल्या तर कोविड-19 ची रुग्णसंख्या कमी करण्याच्या कामी त्या मोठे योगदान देऊ शकतील. सर्वांना हवेहवेसे सण साजरे करताना सामाजिक वर्तणुकीचे नियम पाळून आपण आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवू शकतो आणि विषाणूला प्रतिबंध करण्याच्या कामी आपली भूमिका बजावू शकतो. सणांमध्ये सहभागी होताना पुढील काही सूचना जरूर ध्यानात ठेवाः

इतरांच्या संपका&त येणे शक्यतो टाळायला हवे, विशेषतः सध्याची परिस्थिती लक्षात घेता एकमेकांना भेटताना नम्रतेने केलेला नमस्कार अधिक सुरक्षित ठरेल. जिथे खूप लोक जमले असतील अशा ठिकाणांपासून दूर रहा आणि शक्यतो सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. सध्या मास्क लावणे अनिवार्य नाही, तरीही प्रत्येकाने मास्क घालायला हवा. विशेषतः घराबाहेर पडताना हे कटाक्षाने करायला हवे. तुमचे नाक, तोंड आणि हनुवटी झाकलेली असायला हवी.

शक्यतो सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा. कारण त्यामुळे विषाणू संसर्गाचा धोका कमी होतो. तुम्ही बाहेरून घरात येत असाल तर आपले हात सॅनिटाइझ करा.

तुम्हाला कफ झाला असेल तर खोकताना आपले तोंड कोपऱ्यामध्ये दडवा.

आपला चेहरा आणि नाक यांना, विशेषतः न धुतलेल्या आणि सॅनिटाइझ न केलेल्या हातांनी विनाकारण स्पर्श करू नका.

घरगुती पार्टीचा बेत असेल तर बोटांनी उचलून खाता येण्यासारखे, प्लेट्स, कटलरी किंवा कपची देवाणघेवाण करण्याची फारशी गरज भासणार नाही असे पदार्थ ठेवा. शिवाय अशी गेट टुगेदर्स घराबाहेर करणे अधिक चांगले. कारण घरांमध्ये वायुविजनाची फारशी चांगली सोय नसते. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.

सकस अन्न खा आणि फिझ्झी ड्रिंक्स पिणे टाळा. म्हणजे तुमच्या रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होणार नाही.

कमीत कमी पाहुण्यांना बोलवा किंवा तुमच्या आप्तेष्टांना आपापल्या घरांतूनच सणांचा आनंद साजरा करता यावा यासाठी ई-दर्शनसारख्या पर्यायांचाही वापर तुम्ही करू शकता.

सण साजरा करून घरी परतल्यानंतर आपले बूट-चपला घराबाहेरच ठेवा आणि लगेच आंघोळ करा.

कोविड-19ची लक्षणे आढळल्यास स्वतःला तत्काळ वेगळे करा आणि पुढील उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

– डॉ. संदीप पाटील  (चीफ इंटेन्सिव्हिस्ट, पहर्टिस हॉस्पिटल, कल्याण)