
मागील सरकारने मला खूप त्रास दिला, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर न्याय मिळाला, असे वक्तव्य करीत प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
नगर जिल्ह्यातील वंजारवाडी (ता. नेवासा) येथे संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेला समाजभूषण पुरस्कार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
या वेळी उदयन गडाख, इंदोरीकर महाराज आदी उपस्थित होते. डॉ. लहाने म्हणाले, मागील सरकारने मला खूप त्रास दिला. पण आता आघाडी सरकारमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी माझी बाजू मांडून मला शासनस्तरावर काम करण्याची संधी दिली. मुंडे यांना चांगल्या कामांसाठी आपला पाठिंबा आहे, अशी भूमिका डॉ. लहाने यांनी या वेळी मांडली.
जातीवर गावाचे नाव नसावे – धनंजय मुंडे
जातीवर एखाद्या गावाचे नाव असणे हे आपल्याला शोभणारे आणि परवडणारेही नाही. त्यामुळे गावकऱयांनी ग्रामसभेत ठराव घेऊन आपल्या गावांची नावं ही जाती आधारित न ठेवता संत, महामानवांच्या किंवा महापुरुषांच्या नावाने ठेवावीत, अशी इच्छा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.





























































