मुंबईत वर्षभर होणार नालेसफाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

पालिका कंत्राटदाराच्या माध्यमातून करून घेत असलेली नालेसफाई समाधानकारक होत नसल्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे मुंबईत नालेसफाई वर्षभर करा अशी जोरदार मागणी शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी आज स्थायी समितीत केली. याला पालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आज सुट्टीच्या दिवशी स्थायी समितीची बैठक आयोजित करून अनेक विकासकामे मार्गी लावण्यात आली. यामध्ये छोटय़ा नाल्यांमधील गाळ काढण्याचे 36 कोटींचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव आला असता शिवसेनेसह सर्वपक्षीय सदस्यांनी कंत्राटदारांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. सभागृह नेत्या विशाखा राऊत, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, नगरसेविका राजुल पटेल, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी नालेसफाई वर्षभर करावी, अशी मागणी केली.

कंत्राटदारांच्या कामावर नाराजी
कंत्राटदार कोटय़वधी रुपये घेऊनही कामे नीट करीत नाहीत. त्यामुळे पालिका स्वतः कामगारांची भरती करून कामे का करून घेत नाही, असा सवाल राजुल पटेल यांनी केला. कंत्राटदारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी कंत्राट देण्याचे निकष बदलण्याची मागणी मंगेश सातमकर यांनी केली. एकदा नालेसफाई झाली तरी पुढच्या पंधरा दिवसांतच नाल्यांमध्ये प्रचंड गाळ दिसत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कंत्राटदारांकडे कामगारांची कमतरता असल्यामुळे काम नीट होत नसल्याचे रमेश कोरगावकर म्हणाले, तर जेक्हा जेक्हा नाले तुंबतील तेक्हा तेव्हा कंत्राटदारांकडून काम करकून घ्या, अशा सूचना राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांनी केल्या.