घरांचे स्वप्न भंगले, ८० जणांचे बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

दादर पश्चिम येथील छप्रा व मोहसीन बिल्डिंगमधील १४४ भाडेकरूंना विकासाच्या नावाखाली घराबाहेर काढणाऱया बोरिवलीच्या शुभ इंटरप्रायझेसचा मालक उदय सुर्वे याच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात फसवणुकीचा १३ वा नवा गुन्हा दाखल झाला असून डी. एन. नगर, एम.एच.बी., कांदिवली, कस्तुरबा, कांजुरमार्ग, ओशिवरा, अंधेरी, वनराई आदी पोलीस ठाण्यांत यापूर्वी उदय सुर्वे याच्याविरोधात १२ ठिकाणी मोठी घरे देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. यादरम्यान छप्रा व मोहसीन इमारतीमधील ८० रहिवाशांचे नवीन घरांचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. त्यांनी घर-घर करून प्राण सोडले.

दादर येथील छप्रा (गुलसरूफ) व मोहसीन इमारतीमधील रहिवाशांची पुनर्विकासाच्या नावाखाली २००७ व २००९ साली घरे खाली करण्यात आली. ११४ भाडेकरूंना भाडय़ाची रक्कमही बिल्डरतर्फे दरमहा देण्यात येत होती, परंतु २०१३-१४ पासून उदय सुर्वे याने भाडे देणे बंद केले. थकबाकी वाढल्यानंतर न वटणारे चेक देण्यात आले. त्यामुळे भाडय़ाने मुंबईबाहेर राहणारे रहिवासी कंगाल व बेघर झाले असून बिल्डरने तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही. भाडेकरूंच्या खाली केलेल्या जागेवर अर्धवट बांधकामांचे केवळ सांगाडे उभे आहेत. इमारतीचे बांधकाम कधी पूर्ण होईल माहीत नाही. आमच्या स्वतःच्या मालकीची घरे खाली करून आज एक दशक लोटले आहे तरीही आम्हाला आमची हक्काची घरे मिळालेली नाहीत, असे छप्रा इमारतीचे रहिवासी सांगत आहेत.

दादर येथील छप्रा बिल्डिंगमधील रहिवाशांप्रमाणे बोरिवली, कांदिवली, अंधेरी, कांजुरमार्ग, ओशिवरा, वनराई, डी. एन. नगर आदी ठिकाणचेही उदय सुर्वेचे गृहनिर्माण प्रकल्प रखडले असून बेघर झालेल्या रहिवाशांनी उदय सुर्वेविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. उदय सुर्वे व त्याच्या भागीदारांविरुद्ध डी. एन. नगर पोलीस ठाण्यात तर ५ गुन्हे दाखल आहेत. उदय सुर्वेविरुद्ध वाढत चाललेल्या गुन्हय़ांची संख्या लक्षात घेता शिवाजी पार्क येथे दाखल झालेल्या उदय सुर्वेविरुद्धचा गुन्हा मुंबई गुन्हे शाखेत (आर्थिक घोटाळा) वर्ग करावा, अशी विनंती छप्रा व मोहसीन बिल्डिंगमधील रहिवाशांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

छोटय़ा घरात राहणाऱ्या छप्रा बिल्डिंगमधील रहिवाशांना मोठय़ा घराचे स्वप्न दाखवून उदय सुर्वे याने २००७ साली घराबाहेर काढले. तीन वर्षांत तुम्ही सुसज्ज फ्लॅटमध्ये राहायला जाल असे सांगितले. परंतु दहा वर्षांत छप्रा बिल्डिंगमधील १४४ रहिवाशांचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. उलट गेल्या १० वर्षांत घर मिळेल या आशेवर असणाऱ्या ८० रहिवाशांनी आतापर्यंत आपले प्राण सोडले आहेत.