पुणे, जळगावातील मंदिरातही ड्रेसकोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूरनंतर आता पुणे आणि जळगावातील मंदिरातही ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे येथील वाघोलीच्या वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱयात दर्शनासाठी जाताना तोकडय़ा कपडय़ांवर बंदी घातली आहे, तर जळगावच्या अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरातही ड्रेसकोड लागू केला आहे. या दोन्ही मंदिरांत शॉर्ट स्कर्ट, पॅण्ट, वन पीस असे कपडे परिधान करणाऱयांना प्रवेशबंदी असणार आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगीदेवी मंदिरात ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय विश्वस्तांच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.

तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात ड्रेसकोडचा निर्णय सर्वात आधी घेण्यात आला. मात्र भाविकांचा विरोध आणि निर्माण झालेल्या वादानंतर एकाच दिवसात हा निर्णय मागे घेण्यात आला. यानंतर नागपूरमधील चार मंदिरांत ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आला. नागपूर जिह्यातील श्री गोपाळकृष्ण मंदिर गोरक्षण सभा (धंतोली), श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर (बेलोरी), श्री बृहस्पती मंदिर (कानोलीबारा), श्री दुर्गामाता मंदिर (हिल टॉप) या मंदिरांत ड्रेसकोडची सक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला. तसेच राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यासाठी व्यापक अभियान राबवून जनजागृती करणार असल्याचा निर्धारही महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी केला.

तोकडे कपडे घातल्यामुळे मंदिरातील पावित्र्याचा भंग होत आहे अशा तक्रारी येत असल्यामुळे ड्रेसकोडचा निर्णय राबविण्यात आला असल्याचे विविध मंदिर समित्यांचे म्हणणे आहे. सप्तशृंगी मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी भाविकांना ड्रेसकोड लागू व्हावा यासाठी श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ सकारात्मक आहेत. मात्र अद्याप तरी तसा कोणताही निर्णय घेतलेला नाही. महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतलेला निर्णय व त्यातील वस्त्रसंहिता याबाबतची तरतूद तपासून विश्वस्त संस्थान योग्य तो निर्णय घेऊन दर्शन प्रक्रिया राबवेल, असे विश्वस्त अॅड. दीपक पाटोदकर, ललित निकम यांनी सांगितले.

पुजारी अर्धनग्न नसतात का?

मंदिरात ड्रेसकोड लागू करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. मंदिरात जे पुजारी असतात ते अर्धनग्न नसतात का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मंदिराच्या गाभाऱयात उघडेबंब असणाऱया पुजाऱयांनी आधी सदरा घालावा. त्यांनी गळय़ात तुळशीमाळ घातली तरी ते पुजारी आहेत हे ओळखता येईल, असेही ते म्हणाले.