रात्री झोपण्यापूर्वी दुधात गूळ मिसळून पिण्याचे अनेक फायदे !

दुधाला पूर्णान्न म्हणतात. सुदृढ आरोग्याकरिता दूध पिणे अत्यंत फायदेशीर आहे. बऱ्याच जणांना साखर घातलेले दूध प्यायला आवडते, पण साखरेऐवजी दुधात गूळ मिसळून प्यायल्यास बऱ्याच शारीरिक व्याधी दूर होतात. अनेक वैद्य दुधात गूळ घालून पिण्याचा सल्ला देतात.

गूळ खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि दुधामुळे शरीराला ऊर्जा मिळते. याकरिता दररोज झोपण्यापूर्वी गूळ घातलेले दूध प्यावे. यामुळे पचनक्रियाही चांगली राहते. पोटातील गॅसेसची समस्या दूर होते.

काही लोकांना सर्दी, पोटदुखी असे त्रास सतत होत असतात. अशा लोकांनी रात्री एक ग्लास गरम दुधात गुळाचा छोटासा खडा टाकून दूध प्यायल्याने या त्रासांवर आराम मिळतो.

दूध आणि गूळ खाल्ल्याने त्वचा तजेलदार होते. त्वचाविकार होत नाहीत. शिवाय केसांचेही पोषण होते. ज्यांना केसगळतीची समस्या आहे तसेच त्वचाविकाराचा त्रास होत असतो त्यांनी दुधात गूळ घालून प्यावे.

वाढत्या वयामुळे संधीवाताचा त्रास बळावतो. अशांनी झोपण्यापूर्वी गूळ घातलेले दूध प्यावे. दूध आणि गूळ मिश्रणात जीवनसत्त्व डी, कॅल्शियम, आयर्न असते. त्यामुळे संधीवातावर हे दूध गुणकारी समजले जाते. महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारे  दूध प्यायल्याने शरीरातील फॅट (मेद) कमी होतो.

अशक्तपणा कमी होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे दुधात गूळ मिसळून दूध पिणे. गुळामुळे पोट शांत राहण्यास मदत होते. अपचन, आतड्यांचे आजार, अतिसार असे अनेक आजार यामुळे बरे होतात.

मासिक पाळीच्या वेळी महिलांनी दुधात गूळ मिसळलेले दूध प्यायल्यास त्रास कमी होतो. कामाच्या ताणामुळे जास्त थकवा आला असेल तर गरम दूध आणि गूळ खा. यामुळे थकवा दूर होऊन आराम मिळतो. उत्साही वाटू लागते.

आपली प्रतिक्रिया द्या