
मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी पालिका समुद्राचे खारे पाणी गोड बनवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मनोरी येथे उभारत आहे. सौरऊर्जेवर चालणाऱया या प्रकल्पातून मुंबईला दररोज 400 दशलक्ष लिटर पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. यासाठी पालिकेचा पालघरमधील प्रस्तावित गारगाई धरण प्रकल्प तूर्तास बाजूला ठेवून मनोरीच्या प्रकल्पाला गती दिली जाणार आहे. परिणामी गारगाई प्रकल्पात बुडिताखाली जाणारी तब्बल तीन लाख झाडे वाचणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा प्रकल्पातून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून मुंबईचे वाढलेले औद्योगिकीकरण आणि नागरिकरणामुळे दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे पालिका मुंबईसाठी पाण्याचे नवे स्रोत शोधत आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प राबवण्यासाठी वेगाने कार्यवाही सुरू आहे. या प्रकल्पासाठी पालिका सुमारे 3520 कोटींचा खर्च करणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दररोज 200 तर दुसऱया टप्प्यात दशलक्ष 400 दशलक्ष लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मनोरी प्रकल्पाइतकेच 400 दशलक्ष लिटर पाणी मिळणारा गारगाई प्रकल्प तूर्तास बाजूला ठेवण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.
पर्यावरणाची कोणतीही हानी नाही
मनोरीत प्रकल्प उभारला जाणारा भाग खडकाळ आहे. या ठिकाणी कांदळवन नाही. त्यामुळे या प्रकल्पामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही. सद्यस्थितीत पालिका एक हजार लिटर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी 25 रुपयांपर्यंत खर्च करून मुंबईकरांना हे पाणी 3 ते 4 रुपयांत 1 हजार प्रतिलिटरप्रमाणे उपलब्ध करून देत आहे. ‘गोडे पाणी’ प्रकल्प हा खर्च 30 रुपयांपर्यंत होणार असला तरी हा प्रकल्प पर्यावरणपूरक ठरणार आहे.
असा उभारणार प्रकल्प
‘एमटीडीसी’कडून मिळणाऱया 12 हेक्टर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे पालिकेला या प्रकल्पाच्या जागेसाठी खर्च करावा लागणार नाही. या प्रकल्पासाठी इस्रायली तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.
विजेसाठी ‘मोडकसागर’वरही सौरऊर्जा
‘गोड पाणी’ प्रकल्पासाठी सुरुवातीला याच ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारून प्रकल्पासाठी वीजनिर्मिती केली जाणार आहे. शिवाय पालिकेच्या मोडकसागर धरणावरही सौरऊर्जा निर्माण करून या प्रकल्पासाठी वीजनिर्मिती केली जाणार आहे. यामुळे पालिकेचा विजेचा खर्च वाचला जाणार असून जादा विजेमुळे उत्पन्नही मिळणार आहे.





























































