
सामना ऑनलाईन, संभाजीनगर
दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाडय़ाचा धीर आता सुटू लागला आहे. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही अशा दुष्टचक्रात मराठवाडा सापडला आहे. त्यातच दुष्काळी उपाययोजनांमध्ये होणारा विलंब, प्रशासकीय स्तरावर असलेली अनास्था यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी मराठवाडय़ातील मजुरांवर स्थलांतराची वेळ आली आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून मराठवाडय़ाची पाण्यासाठी वणवण चालू आहे. गंभीर परिस्थिती पाहून राज्य सरकारने ऑक्टोबरमध्ये मराठवाडा दुष्काळी जाहीर केला. केंद्राच्या पथकाने पाहणी करून अहवाल दिला. दुष्काळी भागासाठी मदतही जाहीर झाली, मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे मदत मिळण्यास विलंब होत असल्याने दुष्काळी उपाययोजनाच ठप्प झाल्या आहेत. स्थलांतर होत असेल तर ते गंभीर आहे. याबाबत आठही जिल्हय़ांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाईल, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले.
पालकमंत्र्यांना पाणी पाजले
भयंकर दुष्काळ, थेंबभर पाण्यासाठी करावी लागणारी वणवण, प्रशासनाचा अक्षम्य आळस यामुळे महिलांच्या संतापाचा कडेलोट झाला. दुष्काळ पाहणीसाठी आलेले पालकमंत्री दिलीप कांबळे यांना या रोषाचा सामना करावा लागला. संतप्त महिलांनी पालकमंत्र्यांच्या डोक्यावर रिकामा हंडा दिला, तांब्याभर आणलेले पाणी त्यांना प्यायला लावले!
नगरमध्ये महिलेची आत्महत्या
चिचोंडी पाटील गावातील मजुरीचे काम करणाऱ्या संगीता अशोक फसले (42) या महिलेने मुलाच्या बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली. बीएड होऊनही मुलगा बेरोजगार होता. मोलमजुरी करून त्या घराला हातभार लावत होत्या. पण दुष्काळामुळे कामे कमी झाली होती. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली होती. त्यामुळे संगीता त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.






























































