
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना एसटीच्या नोव्हेंबर 2018 ते एप्रिल 2019 या कालावधीच्या मासिक पासाची 79 कोटी 41 लाख 42 हजार इतक्या रकमेची सवलत दिली असून, त्याचा लाभ 20 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना झाला आहे. विद्यार्थ्यांची 33.33 टक्के शैक्षणिक शुल्काची रक्कम माफ करण्यात आली असून राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून शासनाच्या धोरणात्मक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानसभेत निवेदन सादर करताना दिली.
रावते म्हणाले, सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून शासनाच्या धोरणात्मक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात तीव्र पाणीटंचाई असल्याने परिवहन महामंडळाकडे दुष्काळग्रस्त 9 जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 19 गावांना पाणीपुरवठा करण्यात आला. यामध्ये संभाजीनगर, धाराशिव, सातारा, नगर व बुलढाणा या जिल्ह्यात महामंडळाच्या अखत्यारित असणाऱ्या बसस्थानकातील विहिरींमधून तसेच नांदेड व नाशिक येथे एम.आय.डी.सी. मधून आणि परभणी व हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयांकडून पाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहितीही रावते यांनी यावेळी दिली.




























































