‘ऍण्टिबायोटिक्स’नी चिंता वाढवली! हिंदुस्थानात कोरोनाच्या पहिल्या लाटेत औषधांचा दुरुपयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पहिल्या लाटेत हिंदुस्थानात ऑण्टिबायोटिक्स औषधांचा दुरुपयोग झाला. कोरोनाची सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांनाही ऑण्टिबायोटिक्स दिली गेली. ही औषधे केवळ जिवाणूंच्या संक्रमणावर प्रभावी असतात. कोरोना संक्रमणात या औषधांच्या वापरामुळे धोका वाढला आहे, असा निष्कर्ष अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या सर्वेक्षणात काढला आहे. त्यामुळे हिंदुस्थानची चिंता वाढली आहे.

वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष ‘पीएलओएस मेडिसिन’ नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सर्वेक्षणादरम्यान जानेवारी 2018 ते डिसेंबर 2020 या अवधीत हिंदुस्थानच्या खासगी आरोग्य क्षेत्रात ऑण्टिबायोटिक्स औषधांची झालेली विक्री विचारात घेण्यात आली. त्यातून ऑण्टिबायोटिक्स औषधांच्या वापराचा अतिरेक उजेडात आला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी हिंदुस्थाननेही कडक निर्बंध लावले होते. लोक घराबाहेर न पडल्यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया व इतर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी राहिले होते. वास्तविक, या आजारांवर ऑण्टिबायोटिक्सचा वापर केला जातो. अशा स्थितीत हिंदुस्थानात ऑण्टिबायोटिक्सचा कमी वापर व्हायला होता. मात्र कोरोना वाढताच ऑण्टिबायोटिक्सचा वापर वाढला. कोरोना झालेल्या प्रत्येक रुग्णाला ऑण्टिबायोटिक्स औषधे दिल्याचे सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये 2020 मध्ये ऑण्टिबायोटिक्सचा वापर कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

संशोधकांनी नेमके काय म्हटलेय?

  • ऑण्टिबायोटिक्स केवळ जिवाणूंच्या संक्रमणाविरोधात प्रभावी असतात. ही औषधे कोविड-19 यांसारख्या विषाणूच्या संक्रमणाविरोधात परिणामकारक नसतात.
  • ऑण्टिबायोटिक्स अधिक प्रमाणात घेण्याने किरकोळ जखमा तसेच न्यूमोनिया यांसारख्या सामान्य संक्रमणाच्या उपचारांवर उलट परिणाम होतो. किरकोळ संक्रमण गंभीर आणि जीवघेणे ठरू शकते.