
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई युनिटने जोगेश्वरी आणि डोंगरी येथे छापे टापून दोन तस्करांना अटक केली. इब्राहिम मुजावर ऊर्फ इब्राहिम कासकर आणि आसिफ राजकोटवाला अशी त्या दोघांची नावे आहेत. एनसीबीने इब्राहिमची एक गाडी जप्त केली असून त्या गाडीचा वापर तो ड्रग्ज तस्करीसाठी करत होता.
उपनगरात काही पेडलर हे ड्रग्जची तस्करी करत असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई युनिटला मिळाली. त्या माहितीनंतर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने जोगेश्वरी येथे कारवाई करून इब्राहिमला ताब्यात घेतले. एनसीबीने इब्राहिम कडून 100 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले आहे. इब्राहिम हा दाऊदचा भाऊ असल्याचे भासवून ड्रग्जची तस्करी करत होता. एनसीबीने इब्राहिमची एक गाडी जप्त केली आहे. त्या गाडीचा वापर ड्रग्ज तस्करीसाठी केला जायचा असे एनसीबी सूत्रांनी सांगितले.
इब्राहिमच्या चौकशीनंतर एनसीबीचे पथक डोंगरी येथे गेले. तेथून आसिफला एनसीबीने ताब्यात घेऊन त्याच्याकडून काही ग्रॅम चरस जप्त केले आहे. गेल्या वर्षभरापासून इब्राहिम आणि आसिफ हे एकमेकांच्या संपर्कात होते. पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी इब्राहिमविरोधात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात तो जामिनावर असल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे. ड्रग्जप्रकरणी एनसीबीने आसिफ आणि इब्राहिमविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.






























































