कल्याणमध्ये सात कोटींचे ड्रग्ज जप्त; 146 आरोपींच्या मुसक्या आवळल्या, अमली पदार्थविरोधी टीमची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षभरात कल्याण अमली पदार्थविरोधी टीमने धडक कारवाई करत सात कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. त्यात एमडी, गांजा, चरस, नशेच्या बाटल्या आदींचा समावेश आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान विविध ठिकाणी छापे टाकून ही कारवाई करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये १४६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे ड्रग्जमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

कल्याण-डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा धंदा सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यासाठी विविध पथके स्थापन करून ड्रग्जचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. त्यामध्ये २४४ किलो ८१८ ग्रॅम गांजा, १४७ ग्रॅम एमडी, १११ ग्रॅम चरस तसेच १८०० नशेच्या सिरपच्या बाटल्यांचा समावेश आहे. या प्रकरणांपैकी काही गंभीर गुन्ह्यांमध्ये मोक्का कायद्यांतर्गतदेखील कारवाई करण्यात आली आहे.

  • पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सातत्याने गुप्त माहितीच्या आधारे सापळे रचून कारवाया केल्या. विशेष अमली पदार्थविरोधी पथकाने स्थानिक पोलीस ठाण्याच्या समन्वयाने ही मोहीम प्रभावीपणे राबवली.
  • कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, कल्याण-डोंबिवली शहरात अमली पदार्थांच्या तस्करीला कोणतीही मुभा दिली जाणार नाही. पुढील काळातही अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहणार आहे.

चोरी छुपके विक्रीची माहिती द्या

नागरिकांनी आपल्या परिसरात अमली पदार्थांची तस्करी अथवा चोरीछुपे खरेदी-विक्री होत असल्याची माहिती तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास द्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त झेंडे यांनी केले आहे. दरम्यान अमली पदार्थांविरोधातील ही मोठी कारवाई ठरली आहे. तसेच युवकांमधील वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी यापुढेही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.