दारुच्या नशेत संसाराची राखरांगोळी; डोक्यात दगड मारून पतीने केली पत्नीची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दारूच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पळसखेडा मुर्तड येथे बुधवारी रात्री घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर घाबरलेल्या पतीने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. संगिता अर्जुन सोनवणे (45) असे मृत महिलेचे नाव असून अर्जुन चांगु सोनवणे (55) असे तिच्या पतीचे नाव आहे. या घटनेनंतर गुरुवारी सकाळी अर्जुनने विषारी औषध प्राशन केले. त्याला उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील पलसखेडा मुर्तड येथील अर्जुन सोनवणे हे परिवारासह तालुक्यातील वरूड शिवारात राहत होते. अर्जुनला दारूचे व्यसन असल्याने पत्नीसोबत नेहमी वाद होत असत. बुधवारी संगिता अंगणात गहू वाळवत असताना दारूच्या नशेत आलेल्या अर्जुनने गहू वाळविण्यासाठी दुसरी पट्टी का टाकली नाही, असे म्हणत रागाच्या भरात तिच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली व ती जमिनीवर खाली कोसळली. यावेळी त्यांचा शाळेतील मुलगा आल्यानंतर त्याने आपल्या आईला जखमी अवस्थेत बघितल्यानंतर आरडाओरडा केला. त्यावेळी शेजार्‍यांनी संगिता यांना खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

पती पत्नीस चार मुली व एक मुलगा असुन तो सध्या शिक्षण घेत असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. घटनेनंतर अर्जुन घटनास्थळावरून पसार झाला. जखमी अवस्थेत संगिता यांना सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. याप्रकरणी मृत संगिता यांचे भाऊ संजय रामराव गावंडे यांनी भोकरदन पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर गुरुवारी सकाळी अर्जुनने विषारी औषध प्राशन केले. त्याला उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दुरुच्या नशेमुळे एका क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि संसाराची राख रांगोळी झाली हा प्रत्यय या घटनेने आला आहे .पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे करत आहेत.