
‘घराला घरपण मिळवून देणारी माणसे’ अशी जाहिरात करून कोटय़वधी रुपये किमतीची घरे बांधणार्या डीएसकेना स्वतःचेच घर भाड्याने मिळावे म्हणून हायकोर्टात धाव घेण्याची वेळ आली आहे. ग्राहकांची फसवणूक करणार्या डीएसकेंचा पुण्यातील बंगला ‘ईडी’ने जप्त केला. हे घर भाड्याने राहायला मिळावे अशी डीएसकेनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सुमारे 11 लाख रुपये भरून डीएसके दोन महिन्यांसाठी स्वतःच्याच घरात भाड्याने राहणार आहेत अशी माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात दिली.
जास्त पैशांचे आमिष दाखवून पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांनी हजारो गुंतवणूकदारांना फसवले. याप्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून डीएसके तुरुंगात आहेत. ‘ईडी’ने डीएसकेंचा पुण्यातील डीएसके व्हिला येथील 11 कोटी रुपये किमतीचा 355 चौ.मी.चा बंगला जप्त केला असून ईडीकडे तो भाड्याने द्यावा अशी मागणी केली. याप्रकरणी ईडीने बाजारभावानुसार या बंगल्याचे 11 लाख रुपये भाडे द्यावे अशी मागणी केली आहे. सत्र न्यायालयाने डीएसकेना याबाबत निर्णय घेण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत 25 सप्टेंबर रोजी संपली व बंगला ताब्यात घेतला. त्यावर डीएसकेनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याप्रकरणी अपील केले व तीन लाख रुपये दरमहा भाडे भरण्याची तयारी दाखवली. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीत ईडीने तीन लाख रुपये भाड्याऐवजी रेडी रेकनर दराने म्हणजेच 11 लाख रुपये भाडे द्यावे अशी मागणी केली. ईडीच्या वतीने ऍड. हितेन वेनेगावकर यांनी बाजू मांडली.



























































