
सामना प्रतिनिधी । लातूर
सध्या मराठवाड्यात सर्वाधिक ऊस आहे. दुष्काळमुक्तीचा निर्धार करत असताना या भागातील जनतेने इतर पिकांचाही विचार करण्याची गरज आहे. उसासाठी भरपूर पाणी लागते. त्यामुळे पीक पद्धतीत बदल झाला तरच दुष्काळमुक्ती होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भूकंपग्रस्त भागातील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या कुटुंबाला घर किंवा प्लॉट देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र शासन आणि भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने किल्लारी येथे आयोजित करण्यात आलेल्या लातूर व धाराशिव जिल्हे दुष्काळमुक्तीचा निर्धार समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, शिवराज पाटील चाकूरकर, धाराशिवचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, टाटा ट्रस्टचे अमित चंद्रा, वल्लभ भन्साळी, खासदार रवींद्र गायकवाड, सुनील गायकवाड, डॉ. पद्मसिंह पाटील, मधुकर चव्हाण, बस्वराज पाटील, अमित देशमुख, बाळासाहेब जाधव, राहुल मोटे, सुधाकर भालेराव, त्र्यंबक भिसे, सुरजीतसिंह ठाकूर, विक्रम काळे, प्रवीणसिंह परदेशी, गोपाळराव पाटील, रूपाताई पाटील, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, किल्लारी भूकंपानंतर आपत्ती निवारणाचे उत्तम काम शरद पवार यांनी केले. परंतु, भूकंपग्रस्त भागातील काही प्रश्न नव्याने निर्माण झालेले आहेत. आता अनेकांची कुटुंबे मोठी झालेली आहेत, त्यांना पर्यायी घरे किंवा प्लॉट देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. या भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद आहेत, त्या पुन्हा सोलरवर सुरू करण्याचा शासन प्रयत्न करेल. राज्यात ५० टक्के भाग हा दुष्काळाशी कायम सामना करणारा आहे. पाण्याचा पडणारा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. त्यामुळे ८४ टक्के पाऊस होऊनही शेतीच्या उत्पादनात घट झालेली नाही. टँकरच्या संख्येत ८५ टक्के घट झाली तर टँकर लावावे लागणाऱ्या गावांच्या संख्येत ७५ टक्के घट झाली. दुष्काळमुक्तीचे दोन जिल्ह्यांत काम होणार आहे. हे काम झाल्यानंतर पीक पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. सध्या मराठवाड्यात उसाचे क्षेत्र भरपूर वाढलेले आहे. उसाला पाणी भरपूर लागते. कायमचा दुष्काळ मिटवायचा असेल तर इतर पिकांचा विचार झालाच पाहिजे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगीतले.
यावेळी बोलताना शिवराज पाटील चाकूरकर यांनी सांगितले की, आपत्ती निवारणासाठी दीड लाख कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे. परंतू त्याचा वापर कोणीच करत नाही. आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था देशात शरद पवार यांच्यामुळेच निर्माण झाली असेही त्यांनी सांगीतले. पक्ष,जात, धर्म, भाषा, प्रांत विसरुन आपण आपत्तीमध्ये एकत्र येऊन काम करतो हीच खरी आपली शक्ती आहे असेही चाकूरकर यांनी म्हटले. यावेळी बोलताना शिवराज पाटील चाकूरकर यांनी, ‘भाजपा चांगले काम करीत आहे’, असे म्हटले यामुळे व्यासपिठावरील सर्वपक्षीय नेत्यांसह सभामंडपात उपस्थित असणारे नागरिकही आश्चर्यचकित झाले. बोलण्यात झालेली चूक तत्काळ लक्षात येताच चाकूरकरांनी भारतीय जैन संघ अशी सारवासारव केली. मात्र यामुळे व्यासपिठासह संपूर्ण सभामंडपात एकच हास्यकल्लोळ निर्माण झाला.
मूळ कार्यक्रमाविषयी बोलताना शरद पवार यांनी सांगीतले की, भूकंपाच्या आपत्तीमधून आपण बाहेर पडलो पण देशाला एखाद्या आपत्तीमधून बाहेर कसे पडायचे याची निती देण्याचे काम लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील जनतेने दिले आहे. भूकंपानंतर केलेल्या कामाच्या आठवणीही त्यांनी सांगीतल्या.
जैन संघटना सगळीकडून पैसे जमा करतात – शरद पवार
प्रास्ताविक करताना शांतीलाल मुथा यांनी पुण्यात भूकंपग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे ठरवले तेव्हा पवारांनी मदत केली. भाड्याने शाळा उपलब्ध करून दिली, असे सांगितले. शरद पवारांनी आपल्या भाषणात थेट त्यांचे वाभाडेच काढले. जैन संघटनावाले सगळीकडे पैसे मागतात. त्यांनी शाळेच्या जागेच्या भाड्याचे पैसे खरेच दिलेत का याची मी माहिती घेतो, असे यावेळी म्हटले. जैन संघटनावाले सगळीडून पैसे जमा करतात असे त्यांच्याच कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी म्हटल्याची चर्चा सध्या लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात होत आहे.
पवार साहेब, राजकीय आपत्ती कशी निवारण करायची?
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी शरद पवार यांना म्हटले की, पवार साहेब, आपण आपत्ती निवारणामधील जाणकार आहात. राजकीय आपत्ती निवारण कशी करावयाची, याचेही आपण जाणकार आहात, त्यामुळे राजकीय आपत्ती कशी निवारण करावयाची याचे एखादे पुस्तक असेल तर मला द्यावे, मुख्यमंत्र्यांच्या या मागणीवरून सभामंडपात सर्वत्र हशा पसरला. मुख्यमंत्री राजकीय आपत्तीमध्ये सापडले की काय, अशी शंकाही उपस्थित केली जात होती.

































































