मिंधेंच्या बारणेंचा पोपट झाला रे.. निष्ठावान संजोग वाघेरे-पाटील यांच्या विरोधातील डमी नावाच्या उमेदवाराचा अर्ज बाद

इंडिया आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील निष्ठावान उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांना मावळची जनता भरभरून प्रेम देत असल्याने मिंध्यांचे श्रीरंग बारणे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांनी रडीचा डाव खेळत संजोग वाघेरे-पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या नाशिकच्या संजय वाघेरे यांना मावळमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरायला लावला होता. मात्र छाननीत या ‘डमी’ उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने बारणे यांचा पोपटच झाला आहे.

मत विभागणीचा डाव फसला
अनेकदा नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवून मुख्य उमेदवाराला अपशकुन करण्याचा डाव असतो. असाच डाव मावळ लोकसभा मतदारसंघात खेळण्यात आला होता. या मतदारसंघाशी काहीही संबंध नसताना विरोधकांनी नाशिक येथून संजय वाघेरे यांना आयात करून मावळमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायला लावले होते. त्यामुळे या डमी उमेदवाराची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र विरोधकांचा हा डाव उधळला गेला असून कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने संजय वाघेरे यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला.

मास्टर माईंड माहीत आहे !
डमी उमेदवारावरून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, पराभव समोर दिसू लागला की असे रडीचे डाव खेळले जातात. यामागचा मास्टर माईंड कोण आहे हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. त्याचा शोध घेण्याची गरज नाही. ही निवडणूक माझी नसून ‘गद्दार विरुद्ध जनता’ अशी आहे. त्यामुळे कोणी कितीही डावपेच खेळले तरी मतदारराजा आता भुलणार नाही असेही संजोग वाघेरे-पाटील यांनी सांगितले.