
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व खाडी पात्रातील वाळू लिलाव प्रकिया तत्काळ सुरू करून डंपर चालक, मालक व मजूरांची होणारी उपासमार थांबबावी, अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शेकडो डंपर उभे करून ‘डंपर आंदोलन’ छेडले. जोपर्यंत प्रशासनाकडून वाळूलिलाव करण्याबाबात लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे डंपर चालक मालक संघटनेने स्पष्ट केले. यावेळी असंख्य आंदोलक उपस्थित होते.
प्रशासनाने वाळू लिलाव केला नसल्याने बुधवार सकाळपासून कुडाळ तालुका डंपर चालक मालक संघटनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरूवात केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नित्यानंद शिरसाट, अभिषेक गावडे, चित्तरंजन सावंत, समीर दळवी, उल्हास नार्वेकर, ऋषिकेश वजराटकर, संदेश शिरसाट, उमेश दळवी, चेतन पडते, प्रदीप घाडी, विवेकानंद केरकर, दयानंद अणावकर, नितीन गावडे, संदेश मठकर, सुशीलकुमार कदम, देवीदास नाईक, निलेश कनयाळकर, धीरज परब, विनायक राणे, आनंद शिरवलकर यांच्यासह शेकडोजण उपस्थित होते.
प्रशासनाने डिसेंबर सुरू झाला तरी जिल्ह्यातील खाडी पात्रातील वाळू पट्ट्यांचा लिलाव केलेला नाही. या व्यवसायावर उपजिवीका असणा-यांवर बेकारीची कु-हाड कोसळली आहे. त्यामुळे वाळू लिलाव तत्काळ सुरू करा अन्यथा डंपर आंदोलन छेडू असा इशारा कुडाळ तालुका डंपर चालक मालक संघटनेने दिला होता. मात्र प्रशासनाने या मागणीला दाद न दिल्याने अखेर आज बुधवार पासून बेमुदत डंपर आंदोलनास सुरूवात झाली आहे. या आंदोलनाला कुडाळ नगराध्यक्ष ओमकार तेली यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला तर सावंतवाडी डंपर चालक मालक संघटनने यापुर्वीच या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात गौण खनिज उद्योग सुरु असून त्याच्यावर अनेक कुटूंबांचा उदरनिर्वाह चालतो. रोजंदारी मजूर, हमाल, डंपर चालक व मालक, खाण मालक यांची या व्यवसायावर भिस्त असते. मात्र, वाळू उत्खनन ठेका अद्याप सुरु झालेला नाही. पावसाळी कालावधी संपून गेलातरी लिलाव लावण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्ज घेतलेले डंपर मालक व व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
सिंधुदुर्गनगरीस पोलीस छावणीचे रूप
सिंधुदुर्गनगरी 3 मार्च 2016 रोजी झालेल्या डंपर आंदोलनावेळी पोलीस व आंदोलक यांच्यात चकमक उडाली होती. परिणामी प्रकरण हाताबाहेर गेल्यावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. संपूर्ण राज्यात डंपर आंदोलन प्रकरण गाजले होते. विधानसभेत देखील याचे पडसाद उमटले होते. ही सर्व पार्श्वभुमी पाहता आजपासून सुरू करण्यात आलेल्या डंपर आंदोलनास पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र कुडाळ तालुका डंपर चालक मालक संघटनेने आपले आंदोलन लोकशाही पद्धतीने सुरू ठेवले होते.
परिसरात शेकडो डंपर दाखल
बुधवार पासून कुडाळ तालुका चालक मालक संघटनेच्या वतीने वाळू लिलाव या प्रमुख मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. डंपर आंदोलन असल्याने सकाळी दहा वाजल्यापासून कुडाळ तालुक्यातील एक एक डंपर सिंधुदुर्गनगरीत दाखल होत होते. बघता बघता आंदोलन स्थळी शेकडो डंपर दाखल होत आंदोलन छेडले.
चर्चा करून निर्णय घेणार
दरम्यान, डंपर आंदोलनकर्त्यांना जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी चर्चेसाठी पाचारण करण्यात आले होते. या दोन्हांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, वाळू लिलावाबाबत जिल्हा खनिकर्म विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. केवळ महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामुळे ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. याबाबत तेथील अधिका-यांबरोबर बैठका देखील संपन्न झाल्या. येत्या आठ दिवसांत वाळू लिलाव प्रक्रीया पूर्ण होईल असे जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांनी सांगत आंदोलकांना आश्वासित केले.

































































