नांदेडमध्ये 41 लाखांच्या बनावट विदेशी सिगारेट जप्त; दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल

नियमांचे उल्लंघन करून वैधानिक चित्र नसलेल्या बनावट विदेशी सिगारेट ठेवलेल्या फ्रेंडस् दुकान आणि गोडाऊनवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. त्यात 41 लाख 47 हजार 600 रुपयांच्या बनावट विदेशी सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दोन जणांविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड शहरात विदेशी बनावटीच्या सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शहरातील जुना मोंढा भागात फेंडस् दुकान व फेंडस् दुकानाच्या गोडाऊनमध्ये छापा टाकला. त्यात पथकाला सरकारच्या नियमांचे उल्लंघन करून वैधानिक चित्र नसलेल्या बनावट विदेशी सिगारेट आढळून आल्या. या सिगारेटची किंमत 41 लाख 47 हजार 600 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात सुलतान महंमद सुलतान अब्दुल्ला व मोहसीन सौदागर अब्दुल्ला सलीम सौदागर या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत पांचाळ, सहायक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण राठोड, सहायक पोलीस उपनिरीक्षक गोविंद मुंढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बेग, मैसरवाड, पोतदार, तेलंग, हिंगणकर, यादगीरवाड, कांबळे यांनी केली. या पथकासह मुंबईतील एनजीओचे सदस्य सुजीत खंडाळे उपस्थित होते. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत पांचाळ व पोलीस नाईक मैसनवाड करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या