
>> दुर्गेश आखाडे
सरासरी साडेतीन हजार मिमी पाऊस पडूनही कोकणात उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष असते. पाण्यासाठी बायाबापडय़ांना वणवण भटकावे लागते. पूर आणि पाणी टंचाई या दोन्ही संकटांना कोकणी माणूस सामोरा जातो. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील डॉ. चंद्रशेखर गाडगीळ यांनी द्विस्तरीय विहिरीचा अभिनव उपाम राबवून कोकणासमोर एक आदर्श प्रकल्प उभा केला आहे. हा प्रयोग जेव्हा गावागावात राबवला जाईल तेव्हा कोकणी माणूस डॉ. चंद्रशेखर गाडगीळ यांच्या संशोधनाला सलाम करेल. एकाच विहिरीत दोन जलाशय निर्माण करून पावसाचे पाणी साठवून ठेवण्याचा हा भन्नाट प्रयोग डॉ. चंद्रशेखर गाडगीळ यांनी यशस्वी करून दाखवत केंद्र सरकारकडून त्याचे पेटंटही प्राप्त केले आहे. कोकणात प्रचंड पाऊस पडूनही ही लाल माती पाणी धरून ठेवत नाही. त्यामुळे पाणीसाठा करण्यासाठी वेळणेश्वर येथील निवृत्त प्राध्यापक आणि संशोधक डॉ. चंद्रशेखर गाडगीळ यांनी संशोधनाला सुरुवात केली. बहुस्तरीय साठवण विहिरीची रचना त्यांनी तयार केली. विहिरीत झऱयापासून म्हणजे नैसर्गिक स्रोतापासून आलेला पाणीसाठा म्हणजे पहिला जलाशय होय. त्यानंतर विहिरीच्या वरच्या रिकाम्या भागात कीँटचा स्लॅब टाकून एक मजला उभा करून विहिरीची दोन भागात विभागणी केली. स्लॅबच्या वरच्या भागात एक साठवण टाकी तयार केली तो म्हणजे दुसरा जलाशय होय. पावसाळ्यात तुडूंब भरून वाहणाऱया विहिरीतून पाणी बाहेर वाहून जाण्यापेक्षा दुसऱया जलाशयात म्हणजेच साठवण टाकीत पाणीसाठा होतो. शिवाय पावसाच्या पाण्याचा संचय त्या दुसऱया जलाशयात होतो. त्याहीपुढे जाऊन विहिरीच्या भोवताली असलेल्या जमिनीवर आणखी एक साठवण टाकी बांधली. एक प्रवेशनलिका जोडून खालच्या जलाशयातून पाण्याचा पंपाने वापर करता येतो. असा प्रयोग केल्यास केवळ पावसाळ्यातील शेतीवर अवलंबून न राहता शेतकरी वर्षातून दोन पिकं घेऊ शकतो. कोकणातील शेतकऱयांनी हा द्विस्तरीय विहिरीचा प्रयोग करावा अशी इच्छा संशोधक डॉ. चंद्रशेखर गाडगीळ व्यक्त करतात. शेतकऱयाच्या घराभोवती विहीर असते त्या ठिकाणी हा प्रयोग यशस्वी केल्यास डिसेंबर महिन्यानंतरही शेती, बागायती आणि जनावरांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते. आपण दरवर्षी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही मोहीम राबवत कच्चे, वनराई आणि विजय बंधारे बांधतो. त्यामुळे काही प्रमाणात पाणी अडून भूजल पातळी वाढते. डॉ. गाडगीळ यांचे संशोधन वापरून हा प्रयोग शेतकऱयांनी केल्यास पाणी टंचाईवर काही प्रमाणात आपण मात करू शकतो.