
>> द्वारकानाथ संझगिरी
सूर्य चमकला, वेगवान गोलंदाजांनी सुरुवात चांगली करून दिली. मार्व्रर्म आणि मिलरने अप्रतिम लढाई केली. पण आपल्याकडे ऐनवेळी सूर्यावरच सुदर्शन काढणारा कृष्ण नव्हता. अंधार झाला आणि अर्जुनाला हरावं लागलं.
सूर्याची एक महानतेचा स्पर्श असलेली खेळी यश मिरवू शकली नाही. मात्र ती खेळी विव्ह रिचर्ड्स किंवा एबीडीने मिरवली असती. पर्थच्या खेळपट्टीमध्ये बाऊन्स होता. तिथली माती अशी आहे की खेळपट्टी नवी असो वा जुनी आपली अंगभूत गुणवत्ता बदलत नाही. दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यात अशा खेळपट्टीचा फायदा उठवण्याची गुणवत्ता होती. त्यांनी पुल, हूकसाठी चेंडू खिलवले आणि हिंदुस्थानी फलंदाज मोहात पडले. कधी चेंडूच्या वेगाने फसवलं, तर कधी उसळून आलेल्या चेंडूने. असे चेंडू धावा देतात, कधी चौकार तर कधी षटकार. फटक्याची अचूकता किंवा चेंडूचा अंदाज जरा चुकला तर चेंडू हवेत चढतो. चेंडूच्या दिशेवरसुद्धा बरंच अवलंबून असतं. रोहित शर्मासाठी चेंडू इतका वेगात आला की तो त्याच्या बॅटला वर लागला. विराट, हार्दिकचे फटके चुकले. मुख्य म्हणजे रबाडाने उत्कृष्ट झेल घेतले.
पण त्यानंतर सूर्याने जी फलंदाजी केली ती टी-20 साठी सर्वोच्च दर्जाची होती. पहिलं म्हणजे त्याने खेळपट्टीचा बाऊन्स अचूक ओळखला. त्याच्या पायाच्या हालचाली फारच सुंदर होत्या. हूक आरपार मारताना तो ऑफ स्टंपच्या बाहेर मस्त सरकायचा. त्याचे पुल आणि हूक आरपार गेले. तो फटका मारताना, मग तो इंप्रोव्हाईज असला तरी योग्य पोझिशनमध्ये येऊन मारतो. त्याचं डोपं कमालीचं स्थिर असतं. त्याने ती जागा आधी शोधलेली असते. त्या जागेवर सफरीसाठी पाठवायचा चेंडू मिळाल्यावर किंवा आधीच्या फटक्यामुळे गोलंदाजाला भाग पडल्यावर तो तिथे पाठवतो. तो बुद्धिबळ खेळतो आणि दबाव घेत नाही. गोलंदाजांवर दबाव टाकतो. त्याला जोखीम घ्यावी लागते. त्याने एक स्क्वेअरकट स्टंपवरून मारली. ती व्यवस्थित प्लेस केली. कारण त्याचा बाऊन्सचा अंदाज परफेक्ट होता आणि पुढचा बसून मारलेला शॉट ही जादू होती. क्षणात विचार करून त्यांनी बॅट सॉरी जादूची कांडी फिरवली.
त्याने सरळ ड्राईव्ह असा मारला की, त्याहून चांगली सरळ रेषा मारता येणार नाही. तो शेवटपर्यंत टिकला असता तर हिंदुस्थान सामना जिंकला असता. कारण हिंदुस्थानला 10, 15 धावा कमी पडल्या. तरी वेगवान गोलंदाजांनी विशेषतः, अर्शदीप आणि भुवनेश्वर कुमारने काय गोलंदाजी केली! तिथे समुद्राचा वारा येतो. त्याचा उत्तम उपयोग करून चेंडू स्विंग केले. रुसो आणि डिकॉक या दोन विकेट्स पटकन मिळाल्या. आणि काय हवंय? शमीने त्याचा अनुभव दाखवला. 10 षटकांत त्यांच्या 40 च्या आसपास धावा होत्या. पण मार्व्रर्म, मिलरने अश्विन आणि पांडय़ाला टार्गेट केलं. शेवटच्या 3 षटकांत 29 धावा हव्या असताना अश्विनला मारलेले दोन षटकार महाग पडले. तरी 12 चेंडूंत 12 धावा हव्या असताना शमीने पहिल्या चेंडूवर चौकार जाऊनही उत्तम ओव्हर टाकली. फक्त 6 धावा दिल्या. पण मिलर असताना शेवटच्या ओव्हरमधल्या 6 धावा कठीण नव्हत्या. पण एक गोष्ट नक्की हिंदुस्थानी संघाकडे हा कप जिंकायची मोठी संधी आहे. संघ समतोल आहे. विराट, सूर्या प्रचंड फॉर्मात आहेत. क्षेत्ररक्षण सुधारायला हवं आणि राहुलला त्याचा फॉर्म.

























































