
>> द्वारकानाथ संझगिरी
हिंदुस्थानी संघ ‘पांढर्या चेंडूच्या’ क्रिकेटचा ‘दादा’ आहे हे मी न्यूझीलंडमधल्या पहिल्या तीन वन डेनंतर जाहीर करून टाकलं होतं. कसोटी क्रिकेटमध्ये आपण इंग्लंडला इंग्लंडमध्ये, दक्षिण आफ्रिकेला दक्षिण आफ्रिकेत नाही हरवलं.
पण वन डेत? अश्वमेधाचा सोडलेला घोडा कुणी अडवतच नाहीए. 2019च्या विश्वचषकात ‘अश्वमेध यज्ञ’ पूर्ण होणार वगैरे स्वप्नही मला पहाटे पडलं.
अशी लेखाची सुरुवात करून मी एका महत्त्वाच्या कामाला गेलो. रात्री विचार केला. 4-0 वगैरे आघाडी घेतली की लेख पूर्ण करू. आता लेख पूर्ण करायला घेतला आणि न्यूझीलंडकडून एकट्या बोल्टने हॅमिल्टनला घोडा अडवल्यावर मला प्रश्न पडला, आपण सर्वोत्तम आहोत?
एखादी छोटी लढाई हरल्याने ‘महायुद्ध हरू’ असं होत नाही, पण पराभवाची कारणमीमांसा प्रामाणिकपणे करायला हवी. विराट कोहली नव्हता, धोनी नव्हता, शमी नव्हता म्हणून आपण हरलो असं खोटं समाधान करून घेण्यात अर्थ नाही. वर्गशिक्षक रजेवर गेला. त्यामुळे मॉनिटरला वर्गाला दिवसभर काबूत ठेवणं जमलं नाही असंही मी म्हणणार नाही. दर्जेदार ‘स्विंग’च्या दहा षटकांनी आपल्याला हरवलं, किंबहुना गुडघे टेकायला लावलं हेच सत्य आहे.
पहिल्या तीन वन डेत आपण ‘सहज’ जिंकलो ही ‘सुखद’ पण आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती. न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंडला हरवणं सोपं नव्हतं. तिथलं स्विंगला मदत करणारं वातावरण, वारा यामुळे त्या वातावरणाशी चटकन एकरूप होणं कठीण असतं. आपण पहिल्या तीन वन डेत न्यूझीलंड हे आपल्या मागच्या अंगणाचं नाव असल्याप्रमाणे खेळलो. चेंडू फारसा स्विंग होत नव्हता आणि जो व्हायचाय त्याचे सर्व हक्क शमीला दिलेले आहेत असं चित्र होतं. हा हिंदुस्थानी संघ मूलतः समतोल आहे. फलंदाजीत दर्जा आणि खोली आहे. गोलंदाजीत उच्च दर्जाचा स्विंग-स्पिन आहे. त्यामुळे चेंडू फारसा स्विंग न होणार्या वातावरणात कमकुवत फलंदाजी असलेल्या न्यूझीलंडच्या संघाला आपण बुकलून काढलं.
पण स्विंगचं एक छोटं वादळं आलं आणि हिंदुस्थानी संघ कोसळला. खरं तर वादळ शब्दही जरा जास्तच होता. सुटलेला बोचरा वारा म्हणूया! चेंडू स्विंग होत होता पण ‘स्विंग’वेडा झाला नव्हता. धक्का हा होता की एका दर्जेदार स्विंग गोलंदाजाची फक्त दहा षटकं आपला डाव उद्ध्वस्त करायला पुरली. बोल्ट अनुभवी आहे, त्याने चेंडू आत आणला. त्याने बाहेर काढला. मुख्य म्हणजे त्याचा टप्पा आणि दिशा आदर्शवत होती आणि मध्येच बाऊन्सर चांगला वापरला. गडाचा मुख्य दरवाजा चटकन पडल्यावर नवा चेंडू मधली फळी उद्ध्वस्त करून गेला. एक हरलेला टॉस इतकं चित्र बदलतं? की ही तंत्रातली खोट आहे?
चेंडू भन्नाट स्विंग किंवा टर्न होत असताना धावा कुणालाही कठीण असतात, पण अशावेळी काढलेल्या 50 धावा शंभरीच्या मोलाच्या असतात. पण अकरा जणांत सर्वोच्च वैयक्तिक 18 धावा हे लढल्याचं लक्षण नव्हतं. भुईसपाट व्हावं इतका नाही चेंडू अफलातून स्विंग होत नव्हता. त्यामुळे काळजी वाटते. आपण विश्वचषक इंग्लंडमध्ये खेळणार. इंग्लंडचं हवामान हे किती बेभरवशाचं आहे हे सांगायची गरज नाही. अशावेळी एखादा स्पेल असा उद्ध्वस्त करून गेला तर… ज्याला जिंकायचंय त्यांनी सर्व बाजूंनी तयारी करायला हवी. ही जी ठेच लागली त्यातून आपण शिकूया, तर पुढची ठेच टळेल. पहाटेचं स्वप्न खरं होतंच असं नाही. 1983 साली स्वप्नच पडलं नव्हतं तरी आपण विश्वचषक जिंकला. आता स्वप्न तरी पाहतोय.




























































