
>> द्वारकानाथ संझगिरी
विश्वचषकाच्या आपल्या लढाईला चेन्नईपासून सुरुवात होतंय.
चेन्नईची खेळपट्टी ही एकेकाळी विजयाची खेळपट्टी होती. जगातल्या कुठल्याही दादाला येथे बोलवा, आपले दर्जेदार फिरकी गोलंदाज त्या दादाला लोळवत असत.
मग मग तो क्लाईव्ह लॉईडचा वेस्ट इंडीजचा संघ असो किंवा बिल लॉरीचा ऑस्ट्रेलियाचा. 1969 साली हिंदुस्थानच्या इरापल्ली प्रसन्नाने इथेच ऑस्ट्रेलियाची अवस्था एका कसोटीत 6 बाद 21 अशी केली होती आणि तरी हिंदुस्थानी संघ ती कसोटी हरला होता. पण ते दिवस वेगळे होते, आणि आजचे दिवस वेगळे आहेत. जिंकण्याच्या बाबतीतला आपला आजचा आत्मविश्वास हा आकाशाला गवसणी घालणारा आहे. त्यावेळी आपल्यात कुवत असूनसुद्धा आपण स्वतःला क्रिकेटमधले चणे- फुटाणे समजायचो आणि ऑस्ट्रेलियाकडे बदाम-पिस्ते म्हणून पाहायचो. आज आपण बदाम-पिस्ते आहोत आणि तसे समजतोसुद्धा आणि समोरच्या बदाम-पिस्त्याला चणे-फुटाणे म्हणताना अजिबात लाजत नाही.
अर्थात, ऑस्ट्रेलियाचा संघ हा काही चणे-फुटाणेचा संघ नाही. त्याचप्रमाणे पूर्वीपेक्षा आणखीन एक वेगळी गोष्टसुद्धा झाली आहे. ती म्हणजे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आता हिंदुस्थानी खेळपट्टय़ा या परक्या वाटत नाहीत. त्या त्यांच्या घरच्या झालेल्या आहेत. हिंदुस्थान हे त्यांचे आता खडूस सासर नाही, ते माहेराचे एक्स्टेंशन आहे. त्यांच्या क्रिकेटच्या अर्ध्या मोसमात त्यांचे वास्तव्य हे हिंदुस्थानात असते. आयपीएलसाठी तर ते असतात, पण हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यामध्ये जवळपास दरवर्षी मालिका होतात. कधी टी-20, कधी वन डे, तर कधी कसोटी क्रिकेटसाठी. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स काल पत्रकार परिषदेत म्हणाला, ‘पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट गेल्या दहा वर्षांत मी ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त हिंदुस्थानात खेळलो आहे.’ एवढेच नाही तर ज्यावेळी हिंदुस्थान कोविडच्या विळख्यात होता त्यावेळी त्याने पन्नास हजार डॉलर्स हिंदुस्थानला दिले होते.
हिंदुस्थानी वास्तव्याचा त्यांना प्रचंड अनुभव आहे. त्यामुळे पूर्वीइतक्या फिरणाऱ्या खेळपट्टय़ा त्यांना परक्या वाटत नाहीत. त्यांच्यावरचा सराव त्यांना आहे त्याचप्रमाणे अश्विन असो किंवा जडेजा किंवा अगदी कुलदीप या गोलंदाजांना ते आयपीएलमध्ये खेळत असतात. त्यामुळे बाहेरचा पेपर आला असे त्यांना वाटत नाही. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजी ही आपल्यासाठी नवीन नाही. दोघांनाही एकमेकांची ताकद ठाऊक आहे आणि त्या ताकदीप्रमाणे पंजा लढवला जाणार.
हिंदुस्थानी संघाचा विचार केला तर शुभमन गिल खेळणार की नाही याचे उत्तर ना राहुल द्रविडने दिले-ना कर्णधार रोहित शर्माने. दोघांनी मूठ घट्ट बंद ठेवून ‘त्याची प्रकृती सुधारत आहे, उद्या निर्णय घेऊ,’ असे मधाचं बोट लावलं. गिल सध्या प्रचंड फॉर्मात आहे. राजेश खन्ना ऐन भरात असताना जशा तरुणी त्याच्यावर जीव टाकत तशा वन डेतल्या धावा त्याच्यावर जीव टाकतात. कधी कधी वाटतं की निव्वळ सवयीने त्याची बॅट धावा करून जाईल. बॅट कशाला, बॅटचा दांडाही त्याला खेळायला पुरेल. हिंदुस्थानी संघात तो नसणं हा धक्का असला तरी तो धक्का पचवण्याची ताकद सध्या हिंदुस्थानी फलंदाजीत आहे.
रोहित, विराट, अय्यर, किशन, सूर्या, राहुल या प्रत्येकाने अलीकडे धावा केल्या आहेत. पाच फलंदाज, दोन अष्टपैलू, दोन फिरकी आणि दोन वेगवान गोलंदाज घेऊन खेळायला काहीच हरकत नाही. हिंदुस्थानी खेळपट्टय़ा नाहीतरी मंद होत जातात. 2011 साली जी भूमिका युवराजने केली ती जाडेजा किंवा पंडय़ाने, किंवा दोघांनी किंवा प्रत्येकवेळी दोघांपैकी कुणीतरी निभावली तरी खूप मोठं काम होईल. एखाद् दोन भागीदारी पह्डणारे बळी आणि महत्त्वाच्या वेळी खाली येऊन धावा. त्यामुळे तीन फिरकी (वेगवेगळय़ा प्रकारचे) आणि तीन वेगवान गोलंदाज आपल्याला उपलब्ध होतात. त्यामुळे एखादा गोलंदाज चालला नाही तरी दबाव येत नाही. या अशा कॉम्बिनेशनमध्ये फलंदाजी सातनंतर कमकुवत वाटू शकते. म्हणून परवा नेटमध्ये बुमरा आणि अश्विनने कसून सराव केला. नेहमी फलंदाजीला एखाद्या अधिक फलंदाजांची कवचकुंडलं का द्यावीत? गोलंदाजीला का नाहीत?
ऑस्ट्रेलियाची परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्याकडे फिरकी गोलंदाजीची मोठी ताकद नाही. झम्पाच्या 10 षटकांना मॅक्सवेलच्या पार्टटाइम ऑफस्पिनचा आधार लागणार. मॅक्सवेलवर 10 षटके टाकायची जबाबदारी येऊ शकते.
त्यांची ताकद ही वेगवान गोलंदाजी आणि त्यापेक्षा अष्टपैलू खेळाडूही आहे. त्यांच्या फलंदाजीला खोली आहे आणि खाली मोठे फटके मारायची ताकद.
मार्श, स्टॉयनीस, ग्रीन, मॅक्सवेलसारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. कालच्या पत्रकार परिषदेत त्यांचा कर्णधार कमिन्स मिचेल मार्शबद्दल भरभरून बोलला. त्याने त्याला भीम ठरवला. ते खरंय. त्याच्या नुसत्या त्याच्या फुंकरीने चेंडू रॉकेटच रूप घेऊ शकतो.
जवळपास दोन वेगवेगळय़ा ताकदीचे, पण तोडीसतोड संघ एकमेकाला भिडतील तेव्हा उडणाऱ्या ठिणग्या डोळय़ांसाठी अग्निफुल ठरतील.
परवा कुणी तरी राहुल द्रविडला म्हटलं, न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रच नावं राहुल आणि सचिनवरून ठेवलं. तेव्हा राहुल म्हणाला, ‘सचिनचे गुण अधिक दिसतायत. त्याने पाच षटकार ठोकले.’
मग आणि कुणीतरी, एक फुलटॉस द्रविडला टाकला. ‘चेन्नई खेळपट्टीवर किती धावा सेफ मानाव्यात.’
राहुल म्हणाला, ‘प्रतिपक्षापेक्षा एक जास्त.’
राहुल सध्या विनोदी मूडमध्ये आहे. त्याने देशाला भरपूर दिलंय. दुर्दैवाने तो विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग नव्हता. निदान प्रशिक्षक म्हणून तो त्या संघाचा भाग व्हावा. त्याची विनोदबुद्धी, त्याच स्मित असचं राहावं.
गंभीर राहुलपेक्षा हसणारा राहुल अधिक मस्त वाटतो.
आजची लढाई
हिंदुस्थान Vs ऑस्ट्रेलिया
वेळ – दु. 2.00 वा.
लाइव्ह – स्टार स्पोर्ट्स, डिज्नी हॉटस्टार
हार्दिक आताचा युवराज
जी भूमिका 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने साकारली होती तीच भूमिका या वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पंडय़ा निभावणार आहे, असे भाकीत हिंदुस्थानचा माजी कसोटीपटू मोहम्मद पैफने वर्तवले आहे. युवराजने सहाव्या क्रमांकावर येऊन संकटात सापडलेल्या हिंदुस्थानी संघासाठी धावा केल्या होत्या आणि गोलंदाजीतही चमक दाखवली होती. या दोन्ही जबाबदाऱ्या हार्दिकही करतोय आणि तो मैदानात उतरल्यावर केवळ चौकार-षटकार ठोकण्याचेच ध्येय समोर ठेवून उतरतोय. युवराजनेही असेच केले होते.



























































