धोनीचं ‘उत्तरायण’

>> द्वारकानाथ संझगिरी

इंग्लंड संघाची बोट किनार्‍याऐवजी आदळण्यासाठी दगडाकडे निघाली आहे, असं आता जाणकार इंग्लिश टीकाकारांना वाटायला लागलंय.

हिंदुस्थानच्या बाबतीत अजून दिशा तरी किनार्‍याची आहे. अफगाणिस्तान हा वाटेतला अनपेक्षित खडक होता. पण बुमरा-समी-चहल वगैरे गोलंदाज दीपस्तंभासारखे उभे राहिले आणि आपण खडक चुकवला.

तिथे इंग्लंडमध्ये जेफ बायकॉटने थेट तोफच डागली. ‘‘इंग्लंडच्या फलंदाजांनी मूर्खासारखी फलंदाजी केली’’ असं तो लिहून मोकळा झाला. अर्थात जेफ बायकॉट सौम्य भाषेत बोलला असता तर ‘सध्या  बायकॉटला बरं वगैरे नाही का?’ असं विचारलं गेलं असतं.

हिंदुस्थानचा विचार केला तर सचिन तेंडुलकर नावाचा बर्फही काल वितळला. सचिनने टीका केलेली मी फार क्वचित ऐकलीए. पण त्यालाही वाटलं धोनी-जाधव जोडीने अधिक आक्रमकता दाखवायला हवी होती. सुरुवातीपासून शेवटपर्यंत धोनी आणि जाधवचं टायमिंग नीट होत नव्हतं. जाधवने तरी नंतर काही आक्रमक फटके मारले, पण धोनीची कालची खेळी हे अंगाई गीत होतं. धोनीचं कौतुकही यापूर्वी सचिनने केलंय. तो वन डे, टी-20च्या बाबतीत ऑलटाइम ग्रेट क्रिकेटपटू आहे, पण त्याचं ‘उत्तरायण’ आता सुरू झालंय. तो शरपंजरी भीष्म झालाय. एकेकाळी 45 षटकापर्यंत सेट होऊन तो मग खेळीचं एक सणसणीत स्फूर्तिगीत लिहून जायचा. अलीकडे त्याच्या बॅटची अंगाई गीतंच ऐकायला येतात. परवा धोनीला पाहताना नेहमी होणारा आनंद होत नव्हता. किंबहुना यातना होत होत्या. धोनीशी माझा वैयक्तिक संबंध फारसा कधी आलेला नाही. पण क्रिकेटपटू म्हणून तो खूप जवळचा मला वाटत आलाय. जवळच्या माणसाला पूर्वी कधीही करावे न लागणारे कष्ट करावे लागले की, मनाला यातना होतात ती भावना त्यामागे आहे. धोनीच्या बॅटला बॉल बसू नये? ज्या खेळपट्टीवर विराट कोहली हीथ्रो विमानतळाच्या रनवेवर फलंदाजी केल्याप्रमाणे फलंदाजी करीत होता त्या खेळपट्टीवर धोनीला एकेरी धाव घेणे अवघड वाटावं? मला एक जुनी खेळी आठवते. 1973 साली इंग्लंडविरुद्ध ब्रेबॉर्नवर हिंदुस्थानच्या दुसर्‍या डावात पतौडीने 8-10 धावा करताना तीन झेल दिले होते. फलंदाजीच्या नावाने माधुकरी मागतोय हे चित्रच मला असह्य झालं होतं. धोनीची खेळी त्या पतौडीच्या खेळीपेक्षा चांगली होती, पण ती धोनीची नव्हती. अगदी अलीकडच्या धोनीच्या सावलीचीही नव्हती. अफगाणिस्तानने चांगली गोलंदाजी टाकली म्हणून हे घडलं हे विधान तर मी स्वीकारणारच नाही. त्यांनी चांगली गोलंदाजी टाकयची नाही का? आणि तो कोण गुप्ते-वॉर्न किंवा प्रसन्ना-लेकर होते का? इंग्लंडमधील एक उत्कृष्ट विनोदी लेखक म्हणजे वुडहाऊस. पु. ल. देशपांडेंनी त्यांच्याकडून स्फूर्ती घेतली असं म्हटलं जातं. इंग्लंडचा ट्रेव्हर बेली अशी केविलवाणी खेळी खेळायचा. त्याबद्दल लिहिताना एकदा वुडहाऊसने लिहिलं होतं, ‘‘Baily wokeup from an apparent coma and hit a boundary.’’ धोनीच्या एका बाऊंड्रीचं वर्णन मला तसं करावंसं वाटलं. नाही मी काल धोनी पाहिला नाही. तो कुणीतरी तोतया होता. शोधा धोनीला.

मग हे असं का झालं? याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शमी, कुलदीप, चहल, बुमरा ही आपली लांबलचक शेपटी आहे. त्याचं बॅटिंगला जाणं हा एक परंपरेचा भाग आहे. दिवाळीला पहिल्या आंघोळीनंतर आपण पायाखाली कारीट फोडतो तसं! धावा करणं, मोठे फटके मारणं ही त्यांची कुवत नाही. त्यामुळे वरचे फलंदाज बाद झाल्यावर मधल्या फळीवर दबाव येतो. ती मधली फळी कोण? तर विजय शंकर, धोनी, पांड्या, जाधव वगैरे. त्यांना कळत नाही की नेमकं काय करावं? त्यात पांड्या ‘अबतक’ छप्पन्न स्टाइल आहे. त्याला बॅटचा वापर एकाच पद्धतीने करता येतो. विजय शंकर कोवळा आहे. धोनी-जाधव कदाचित या विचारात असावेत की, आता मारताना विकेट गेली तर? थोडं थांबून राहावे. पण त्यावर दुसरा उपाय म्हणजे एकेरी-दुहेरी धावा हावरटासारख्या धावणं. पण त्यासाठी योग्य प्लेसिंग लागते. तेच तर त्यांना जमलं नाही. विराट कोहलीने कुठले मोठे फटके मारले? त्याच्या फटक्यांचा आवाज आला नाही. तो मांजराच्या पावलाने येऊन कधी धावा पिऊन गेला ते कळंलच नाही. त्याचा स्ट्राइक रेट शंभरच्या वर! विकेट जाण्याच्या भीतीने धोनी-जाधवकडून  हेही घडलं नाही. शेवटी जाधवने मारलेले मोठे फटके कसेबसे पुरले, पण ते सुखी संसाराला पुरेसे नव्हते. हे पुढे घडू नये ही अपेक्षा आहे. प्रत्येक वेळी रोहित-विराटच्या शतकांवर अवलंबून राहून चालणार नाही. ते अमरपट्टा बांधून फलंदाजी करू शकत नाहीत.

या एकंदरीत फलंदाजीच्या अपयशाचा हिंदुस्थानच्या कर्णधारावर केवढा परिणाम झाला! तो अलीकडे आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करतोय. तो चक्क गुडबॉय होतोय. त्याला परवा पायचितचा न्याय मिळवण्यासाठी ‘जहाल’ अपील करावं लागलं. त्याबद्दल अर्थात त्याला दंड झाला. ऐन दबावाच्या क्षणी जुना विराट पुन्हा दिसला.

पण आता आयसीसीनेसुद्धा लक्षात ठेवावं की, मवाळ अपीलचे दिवस संपले. अपीलचा अर्थ ‘पंचांना केलेली विनंती’ असा हल्ली कुणी घेत नाही. एक काळ होता तसा! ऑस्ट्रेलियाचा ओल्डफिल्ड नावाचा यष्टिरक्षक होता. तो अपील अत्यंत अदबीने करायचा. त्यामुळे सर नेव्हील कार्डस्सारख्या महान लेखकाने लिहिलं होतं,  ‘‘He appeals with a ball in one hand and apology in the other.’’ ऑस्ट्रेलियाचा ओल्डफिल्ड आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंचाही आदर्श नाही. ऑस्ट्रेलियाच्या ‘आरे’ला ‘कारे’ करणार्‍या नव्या हिंदुस्थानी पिढीचाही नाही. विराट बदलण्याचा प्रयत्न करतोय, पण जुना विराट पुन्हा उसळून येतोय असं चित्र दिसतंय.

dsanzgiri@hotmail.com