
जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ असलेल्या सातारा जिह्यातील कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार आहे. त्यासाठी आज मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात असलेल्या चार इलेक्ट्रिक बसेसचे तसेच बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. मंत्रालयातून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते व्हीसीद्वारे ई-बसेसचा शुभारंभ करण्यात आला. कास पठारावर पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी (व्हिव्हिंग गॅलरी) सुरू करण्यात येणार आहे.
निसर्गरम्य कास पठार
युनिस्कोनेदेखील कास पठाराला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे सहय़ाद्री पर्वतराजीत सातारा शहरापासून 25 कि.मी. अंतरावर निसर्गरम्य असे कास पठार आहे. या पठारावर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात रंगांचा बहर जवळपास 10 चौरस कि.मी.मध्ये पाहायला मिळतो. 850च्या वनस्पतींच्या प्रजाती या ठिकाणी पहायला मिळतात. त्यामुळे विविध प्रकारचे फुलपाखरूदेखील येथे आढळतात. जून ते ऑक्टोबर या कालावधीत मान्सूनच्या प्रगतीबरोबर फुलांच्या रोपांचे चक्र वाढत असल्याने पठार दर 15-20 दिवसांनी रंग बदलत असल्याचे दिसते. वनस्पती विज्ञानासाठी अजूनही नवीन असलेल्या अनेक जाती पठारावर आढळतात. अनेक स्थानिक व लुप्त होत चालेल्या वनस्पतीसुद्धा इथे आढळतात, हे वनस्पतीशास्त्र्ााच्या अभ्यासात भविष्यातील संशोधनासाठी उपयोगी ठरेल.





























































