ई-चलानविरोधातील तब्बल 59 टक्के तक्रारी फेटाळल्या, मुंबई वाहतूक पोलिसांकडे 14 महिन्यांत 1.81 लाख तक्रारी; आरटीआयमधून माहिती उघडकीस

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलीस संबंधित वाहनधारकाविरोधात ई-चलान जारी करतात. पण ई-चलान जारी करण्याच्या प्रक्रियेविरोधात वाहनधारकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांकडे 14 महिन्यांत ई-चलानविरोधात 1 लाख 81 हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी तब्बल 59 टक्के तक्रारी फेटाळण्यात आल्याचे माहिती अधिकारातून (आरटीआय) उघडकीस आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ई-चलानविरोधातील वाहनधारकांच्या ऑनलाइन तक्रारींचा तपशील मागवला होता. त्यांच्या अर्जाला उत्तर म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी उपलब्ध केलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत ई-चलानविरोधात एपूण 1 लाख 81 हजार 613 ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 1 लाख 7 हजार 850 तक्रारी म्हणजेच जवळपास 59 टक्के तक्रारी फेटाळण्यात आल्या. सद्यस्थितीत दुचाकी, चारचाकी, प्रवासी वाहन, मालवाहू अशारीतीने वाहन प्रकारानुसार तक्रारींचे वर्गीकरण पोर्टलवर उपलब्ध नाही. त्यामुळे विशिष्ट वाहन गटांवरील कारवाईचे विश्लेषण करणे शक्य नाही, असे वाहतूक पोलिसांनी कळवले आहे. दरम्यान, ई-चलान प्रणाली पारदर्शक असावी, नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची सखोल तपासणी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.

तक्रार पडताळणी

‘वन स्टेट वन चलन’ पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारी वरळीतील मल्टिमीडिया सेलमार्फत तपासल्या जातात. यामध्ये वाहनांच्या प्रतिमा व इतर दृश्यांतील पुराव्यांचे मूल्यांकन करण्यात येते. पुरावे अस्पष्ट असतील तर त्या तक्रारी संबंधित वाहतूक विभागाकडे पुढील पडताळणीसाठी पाठवल्या जातात.

 556 कोटी रुपये दंडाची वसुली

‘वन स्टेट वन चलन’ या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून मुंबई वाहतूक पोलीस विभागाने 1 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तब्बल 556 कोटी 64 लाख 21 हजार 950 रुपये इतका दंड वसूल केला आहे.