
निलंगा तालुक्यातील कासारशिरसी परिसरात भुकंपाचा धक्का बसला. परंतु भुकंप विज्ञान केंद्राने भुकंप नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु नंतर २.४ रिश्टर स्केलचा भुकंप झाल्याचे मान्य केले आहे.
बुधवारी रात्री 9.23 वाजण्याच्या सुमारास कासारशिरसी परिसरातील मौजे हासोरी , बडूर, उस्तुरी तालुका निलंगा या गावात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळाली होती. तथापि यासंदर्भात राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र नवी दिल्ली येथे सदरील माहिती देऊन चौकशी करण्यात आली असता भूकंपाची नोंद झाली नसल्याचे त्यांचेकडून कळविण्यात आले होते. तथापि जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी (उदा. कलबुर्गी, सोलापूर, नांदेड, लातूर इ.) स्थापित भूकंप मापक यंत्रावर पुनश्च तपासणी करण्याबाबत विनंती करण्यात आली.
त्यानुसार राष्ट्रीय भूकंप मापन केंद्र नवी दिल्ली यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी स्थापित भूकंप मापक यंत्रावरील सिस्मोलॉजिकल डेटा तपासण्यात आला त्यात 2.4 रिश्टर स्केल इतक्या सौम्य भूकंपाची नोंद झाली असल्याचे रात्री 11.40 वाजता त्यांनी कळवले आहे. सदरील भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे असे आवाहन नंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.