हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सिरळी व कळमनुरी तालुक्यातील बोल्डासह परिसरातील दहा गावात गुरुवारी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिक घराबाहेर पडले. सर्वत्र गणेश चतुर्थीनिमित्त लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत असल्याने गणेश भक्त आनंदात असतांना अचानक भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने सिरळी व बोल्डा गावासह परिसरातील काही गावामधील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्यातील जवळपास 25 च्यावर गावामध्ये दीड वर्षापासून सातत्याने भूगर्भात गूढ आवाज येण्याची मालिका सुरु आहे. प्रत्येक महिन्यात कुठे ना कुठे असे प्रकार घडतात. गुरुवारी सकाळी 9 वाजुन 30 मिनिटांनी सिरळी येथे भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. घरावरील पत्रे तसेच ठेवलेल्या वस्तू, घरातील भांडी यांची आदळआपट झाल्याने महिला, मुले, नागरिक घराबाहेर जमा झाले. तसेच बोल्डा परिसरामध्ये देखील काही गावात भूकंप झाला. लातूर येथील भूकंप मापन केंद्रामध्ये हिंगोली जिल्ह्यात 2.53 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली आहे.