पाण्याच्या प्लॅस्टिक बॉटल्सऐवजी इकोफ्रेंडली बॉक्स! पर्यावरण संवर्धनासाठी हैदराबाद येथील दोघा तरुणांचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगासमोर पर्यावरणाच्या प्रदूषणाचे मोठे आव्हान आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम, मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. अशातच हैदराबादच्या दोघा आयटी तज्ञांनी वेगळं पाऊल उचललं आहे. सुनीथ तातिनेनी आणि चैतन्य अयिनपुडी अशी त्यांची नावे आहेत. दोघांनी प्लॅस्टिकचा कचरा कमी करण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्यांऐवजी इकोप्रेंडली बॉक्स तयार केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना पाणी प्लॅस्टिकऐवजी पेपर बॅगेत मिळू शकेल.

सुनीथ तातिनेनी आणि चैतन्य अयिनपुडी यांनी ‘कॅरो वॉटर’ स्टार्टअप सुरू केले आहे. त्यासाठी दोघांनी आपल्या कॉर्पेरेट नोकऱया सोडल्या. कॅरो वॉटर प्रोजेक्टबद्दल सांगताना सुनीथ तातिनेनी म्हणाले, एखादी व्यक्ती लांबच्या प्रवासात कमीत कमी पाच पाण्याच्या बाटल्या खरेदी करते. या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे 10 टक्क्यांपेक्षा कमीच रिसायकलिंग होत आहे. हा खूप गंभीर मुद्दा आहे. त्यावर उपाय शोधताना आम्ही पुठ्ठय़ाच्या बॉक्सचा उपयोग करून पाणी पॅक करायला सुरुवात केली. हे बॉक्सेस मोठय़ा प्रमाणात रिसायकलिंग करणे शक्य आहे. अगदी 100 टक्के रिसायकलिंग केले जाऊ शकते.

सध्या कॅरो वॉटर स्टार्टअप अंतर्गत हॉस्पिटल, हॉटेल आणि लहान पाटर्य़ांवर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. कारण या ठिकाणी प्लॅस्टिकच्या कचऱयाचा ढीग जमा होतो. हैदराबाद आणि आसपासची हॉटेल, हॉस्पिटलमध्ये या इक्रोप्रेंडली बाटल्या वापरायला सुरुवात झाल्याची माहिती चैतन्य याने दिली.

 ‘कॅरो वॉटर’मध्ये पाच लिटर पाण्याची बाटली (कार्डबॉर्ड बॉक्स)  75 रुपयांत उपलब्ध होते. त्यात  फक्त 40 ते 45 ग्रॅम प्लॅस्टिकचा वापर  होतो. जी 20 लिटरची बाटली 120 रुपयांमध्ये विकली जाते त्यात 90 ग्रॅम प्लॅस्टिक वापरले जाते. अशा प्रकारे 85 टक्क्यांपर्यंत प्लॅस्टिकचा उपयोग कमी करण्याचे लक्ष्य सुनीथ आणि चैतन्य यांनी ठेवले आहे.

सध्या अॅपच्या माध्यमातून  पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. ही इकोफ्रेंडली बाटली वापरल्यानंतर ती परत केली जाते. त्यानंतर त्यावर रिसायकलिंग प्रक्रिया केली जाते.