इको फ्रेंडली फटाक्यांचा पर्याय परंतु उपलब्ध नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक छायाचित्र

सामना ऑनलाईन । मुंबई

नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके फोडण्यासाठी नियमावली दिली आहे. तसेच पर्यावरणपूरक असे ग्रीन फटाके फोडण्याचेही सुचवले आहे. परंतु अशा प्रकारचे फटाक्यांची निर्मिती होते हे फटाके विक्री करणार्‍यांच्या गावीही नाही. तसेच एखाद्या ग्राहकाला पर्यावरण फटाके हवे असल्यास त्यासंबंधात कुठलीच माहिती त्याला मिळत नसल्याचे चित्र आहे. हिंदुस्थानी बनावटीचे फटाके हे पर्यावरणपूरक असल्याचे काही फटाके विक्रेत्यांचे म्हणने आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच फटाके वाजवण्याची वेळ नेमून दिली असून पर्यावरण पूरक फटाके वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. इको फ्रेंडली फटाके म्हणजे साधारण फटाक्यांसारखे असतात. फक्त हे फटाके साधारण फटाक्यांपेक्षा ५० टक्के कमी प्रदूषण करतात. पण या फटक्यांची उपलब्धतेबाबत बाजारात संभ्रम दिसत आहे. काही पालकांना हे फटाके हवेत परंतु ते मिळत नसल्याची खंत त्यांनी सांगितली आहे. तर काही फटाके विक्रेत्यांना असे फटाके मिळतात का असा प्रश्न पडला आहे.

कुर्ल्यातील एका फटाक्याविक्रेत्याने प्रतिक्रिया देताना म्हटले की ”हिंदुस्थानी फटाके हे शक्यतो पर्यावरण पूरकच असतात. चीनी बनावटीचे फटाके अधिक प्रदूषण करणारे असतात. त्याचे मुख्य कारण हिंदुस्थानात जे फटाके बनवले जातात त्यात जे रसायन वापरले जातात त्याबाबत हिंदुस्थानात काही नियम आहेत. चीनमध्ये असे काही नियम नसल्याने तिथे सर्रास रसायनांचा वापर होतो आणि तिथले फटाके हिंदूस्थानात विकले जातात.” त्यामुळे प्रदूषण होत असल्याचे त्यांनी सांगितले.