अलिबाग येथील संतोष थळे यांचा अभिनव उपक्रम; पर्यावरण पूरक गणेशमूर्ती साकारल्या

गणेशोत्सव एका आठवड्यावर आला आहे. यंदा अनेक मंडळं इको फ्रेंडली गणेशमूर्तींकडे वळली आहेत. पर्यावरणाचा विचार करत मंडळांनी इको फ्रेंडली गणेशमूर्ती घेत पर्यावरण रक्षणासाठी पावले उचलली आहेत. तसंच पर्यावरणाला हानी होऊ नये, यासाठी अलिबागमधील संतोश थळे यांनी वर्तमानपत्रांपासून पर्यावरणपूरक गणेशमुर्ती साकारल्या आहेत.

वृत्तपत्र हे रोज प्रत्येकाच्या घरी येतात त्यातील बातम्या वाचून झाल्या की, वर्तमानपत्र रद्दी टाकले जाते. अलिबाग तालुक्यातील सागाव येथील शिक्षक संतोष थळे यांनी या रद्दी पेपरांचा वापर करून साच्यातील गणपती, गौरी यांच्या सुबक मुर्ती तयार केल्या आहेत. संतोष थळे हे प्राथमिक शाळेत शिक्षक असून त्यांना टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा छंद आहे. या छंदातूनच त्यांना पेपरपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कल्पना सूचली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी या मूर्ती साकारल्या आहेत. थळे यांनी कागदाच्या लगद्यापासून पहिली गणेशमूर्ती तयार केली. मात्र तिला शाडू वा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीसारखा रेखीवपणा येत नसल्याने त्यांनी साच्यातील गणेश मूर्ती करण्याचे ठरवले.

थळे यांनी गणपतीचा प्रत्येक अवयवांचा साचा तयार करून त्यात पेपरला खळ लावून कागदाच्या बोळ्याने साच्यात भरून रेखीव गणेश मूर्ती तयार केली. शाडू वा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या साच्यात तयार केल्यानंतर सुकण्यास वेळ लागतो. मात्र पेपरची साच्यातील मूर्ती ही एक दीड तासात सुकते. साच्यातून काढलेल्या मूर्तीला रंगरंगोटी केल्यानंतर गणेश मूर्ती आकर्षक दिसू लागल्या. हा प्रयोग केल्याने पेपरपासूनही सुबक व आकर्षक गणेश मुर्ती बनू शकतात याचा प्रत्यय थळे यांना आला. पेपरपासून तयार केलेली गणपती, गौरीच्या मुर्ती या आकर्षक असून हलक्या आहेत. तसेच या मुर्ती विसर्जन करण्यास कमी पाणी लागते. कागदाचे विघटनही लवकर होत असल्याने पर्यावरणाला कोणतीही हानी पोहचत नाही. पेपरपासून बनविलेल्या मुर्ती या चलचित्रासाठीही उपयुक्त असल्याने हव्या तेवढ्या उंच मूर्ती तयार करता येऊ शकतात, असे थळे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या