खूशखबर…हिंदुस्थानात परकीय मुद्रा भंडार वाढले; जगात चौथ्या स्थानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी एक दिवस आधीच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खूषशबर मिळाली आहे. अर्थव्यवस्थेची बळकटी दाखवणाऱ्या मानकांपैकी एक असलेल्या परकीय मुद्रा भंडारात या वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. परकीय मुद्रा भंडाराबाबत हिंदुस्थान जगात आता चौथ्यास्थानी पोहचला आहे.

या आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत परकीय मुद्रा भंडार 600 बिलियन डॉलर(सुमारे 44,810 अब्जांवर) पोहचले होते. तर 31 डिसेंबरपर्यंत ते 633.6 डॉलरवर (सुमारे 47,300 अब्ज) पोहचले होते. आता सर्वात जास्त परकीय मुद्रा भंडार असलेल्या पहिल्या पाच देशांमध्ये हिंदुस्थानचा समावेश झाला आहे. जगात चीन, जपान आणि सित्झर्लंडनंतर आता हिंदुस्थानचा क्रमांक लागतो.

आर्थिक सर्वेक्षण अहवालात देशावरील एकूण परकीय कर्जाचाही उल्लेख करण्यात आला आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत देशावर एकूण 593.1 अब्ज डॉलर (सुमारे44,295 अब्ज रुपये) परकीय कर्ज होते. ते 30 जून 2021 च्या तुलनेत 3.9 टक्क्यांनी वाढले होते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. मंगळवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाची आता सर्वांना प्रतीक्षा आहे. मात्र, त्याआधी देशाचे परकीय मुद्रा भंडार वाढल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.