
प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. ईडीने याप्रकरणी भिलाई येथील बघेल यांच्या निवासस्थानी छापे टाकले.
‘टीव्ही 9 भारतवर्ष’ला ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य बघेल याला मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम 19 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. छाप्यांदरम्यान चैतन्य यांनी सहकार्य न केल्याचा आरोप आहे, आणि नवीन पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात ईडीने यापूर्वीच माजी मंत्री कवासी लाखमा, रायपूरचे महापौर आणि काँग्रेस नेते ऐजाज धेबर यांचे भाऊ अन्वर धेबर, माजी आयएएस अधिकारी अनिल तुतेजा आणि इंडियन टेलिकॉम सर्व्हिस (आयटीएस) अधिकारी अरुणपती त्रिपाठी यांच्यासह अनेकांना अटक केली आहे.
हा कथित दारू घोटाळा 2019 ते 2022 दरम्यान झाला, जेव्हा छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार सत्तेत होते. या घोटाळ्यामुळे राज्याच्या तिजोरीला 2,100 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले, तर दारूच्या सिंडिकेटला अवैध नफा मिळाला, असा आरोप आहे. याप्रकरणी आतापर्यंत 205 कोटी रुपयांच्या मालमत्तेची जप्ती करण्यात आली आहे.