मर्जीने आरोपी निवडणे थांबवा! ’एनसीबी’ही न्यायालयाच्या रडारवर; ड्रग्ज तस्करी प्रकरणात दोघांना जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगेश मोरे

अंमलबजावणी संचालनालयापाठोपाठ (ईडी) नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ही आणखी एक केंद्रीय तपास यंत्रणा न्यायालयाच्या रडारवर आली आहे. एनसीबीच्या पक्षपाती भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढत मुंबई उच्च न्यायालयाने अंधेरीच्या ओशिवरा येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील दोघा आरोपींना जामीन मंजूर केला. गुन्ह्यातील काही निवडक आरोपींनाच अटक का करता? इतर आरोपींवर कारवाई करण्याची तत्परता का दाखवत नाही? मर्जीने आरोपी निवडण्याची ही पद्धत वेळीच थांबवा, अशी सक्त ताकीद न्यायालयाने एनसीबीला दिली आहे.

अंधेरीच्या ओशिवरा परिसरात एनसीबीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये छापेमारी करीत ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्या कारवाईत 20 वर्षीय झैद राणासह शेख फैज नवाझ, झैद जावेद पेटीवाला आणि शुभम सावर्डेकर या आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यांनी जामिनासाठी दाद मागितली. जानेवारीमध्ये झैद राणाचा जामीन अर्ज विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळून लावला होता. आरोपींपैकी शुभम सावर्डेकरची यापूर्वीच जामिनावर सुटका झाली असून उर्वरित तिघांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली.

यावेळी आरोपींतर्फे अॅड. दिलीप मिश्रा आणि अॅड. अयाज खान यांनी, तर एनसीबीतर्फे अॅड. श्रीराम शिरसाट यांनी बाजू मांडली. एनसीबीचे अधिकारी पक्षपाती करताहेत. ज्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे नाहीत त्यांना कोठडीत ठेवले आणि ज्या आरोपीने ड्रग्ज मागवले होते त्याला अद्याप अटक केलेली नाही. त्या आरोपीचा दुसऱ्या प्रकरणांत पंच म्हणून वापर केला जात आहे, असा युक्तिवाद अॅड. दिलीप मिश्रा यांनी केला. त्याची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती डांगरे यांनी एनसीबीचे कडक शब्दांत कान उपटले आणि मर्जीने आरोपी निवडण्याची पद्धत वेळीच थांबवण्याचे सक्त निर्देश केंद्रीय तपास यंत्रणेला दिले.

देशातील तरुण पिढीच्या भविष्याचे भान आहे की नाही?

ड्रग्जची वाढती तस्करी देशातील तरुण पिढीच्या भविष्यावर किती परिणाम करू शकते, याचे तुम्हाला भान आहे की नाही? पक्षपाती न वागता कारवाई करा, असे न्यायमूर्ती डांगरे यांनी एनसीबीला बजावले. ओशिवरा येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात ज्या आरोपीने ड्रग्ज मागवले होते त्याला तुम्ही आरोपी का बनवले नाही? जो आरोपी सापडत नाही असे म्हणता, मग त्याला दुसऱ्या प्रकरणात पंच कसे बनवले जाते? अशा प्रकारचा पक्षपातीपणा करणे थांबवा, याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना द्या, असे निर्देश न्यायमूर्तींनी सरकारी वकील श्रीराम शिरसाट यांना दिले.