लालू यादव यांच्या  निकटवर्तीयांवर  ‘ईडी’ची छापेमारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या निकटवर्तीयांच्या अनेक ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. आरजेडीचे नेते सुभाष यादव यांच्या घरासह अनेक ठिकाणी ईडीने सर्च ऑपरेशन केले आहे. वाळू माफियांशी संबंधित ही कारवाई केल्याचे ईडीकडून सांगण्यात येत असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

सुभाष यादव हे माजी आमदार असून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते झारखंडमधील चतरा या लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. सुभाष यादव हे लालू यादव यांच्या अत्यंत जवळच्या नेत्यांपैकी एक आहेत. सुभाष यादव हे ब्रॉडसन कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवतात. शुक्रवारी आयकर विभागाने आरजेडी नेत्यांच्या घराची झाडाझडती घेतली होती. आमदार विनोद जैस्वाल यांच्या विविध ठिकाणी 6 तासांहून जास्त वेळ झाडाझडती घेतली. या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. लोकसभा निवडणुकीची तारीख जशी जवळ येईल, तशा ईडी आणि सीबीआयच्या धाडी विरोधकांवर वाढतील, अशी भीती बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे.