मुश्रीफ यांच्यामागे ‘ईडी’चा ससेमिरा, आता कोल्हापूर जिल्हा बँकेवर छापेमारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह कागल तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची खाती असलेल्या कापशी येथील शाखा आणि गडहिंग्लजमधील हरळी बुद्रुक येथील शाखेतही ईडीने आज छापा टाकला. यामुळे जिह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. रात्री उशिरापर्यंत बँकेच्या कागदपत्रांची तपासणी सुरू होती.

आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानासह समर्थकांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, पुण्यातील निवासस्थान तसेच मुलीच्या घरी 11 जानेवारी रोजी ईडीच्या पथकाने एकाच वेळी छापे टाकले होते. ईडीच्या या छापेमारीनंतर वातावरण शांत झाले असतानाच 20 दिवसानंतर ईडीने पुन्हा मुश्रीफ यांना टार्गेट केले. आज सकाळी ईडीचे सात ते आठ अधिकारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाहुपुरी येथील मुख्य कार्यालयात पोहचले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ग्रामीण भागातुन बँकेच्या कामासाठी आलेल्या शेतकरी सभासदांची अडवणूक होत असल्याने बँकेचे संचालक व राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने यांच्या कक्षात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली. या मजल्यावर बंदोबस्त ठेवून बँकेतील अन्य व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यात आले.

यापाठोपाठ जिल्हा बँकेच्या गडहिंग्लज तालुक्यातील हरळी बुद्रुक येथील साखर कारखान्याजवळ असणाऱ्या जिल्हा बँकेच्या शाखेवर देखील छापा टाकत चौकशीचे सत्र सायंकाळी उशिरापर्यंत सुरू ठेवले होते. जवळपास पाच ते सहा अधिकाऱ्यांच्या या पथकाने चौकशी व तपासणी केली. या कारवाईवेळी अडचण येऊ नये, म्हणून बंदोबस्तासाठी सीआरपीएफचे जवान तैनात केले होते.