कर्जबुडव्या मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सीला ईडीचा दणका, जप्त केलेली 9371 कोटींची संपत्ती बँकांकडे हस्तांतरित

विविध बँकांचे कोटय़वधींचे कर्ज बुडवून परदेशात पळालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी व मेहुल चोक्सी या तिघा व्यावसायिकांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठा झटका दिला आहे. ईडीने आतापर्यंत या तिघांची 18 हजार 170 कोटींची मालमत्ता जप्त केली असून त्यापैकी 9371.17 कोटींची मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे संबंधित बँकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

किंगफिशर एअरलाईन्सचा मालक विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोक्सी या तिघांनी केलेल्या कर्ज घोटाळय़ांमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे तब्बल 22,585.83 कोटींचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी ईडीने या कर्जबुडव्यांच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. ईडीने बुधवारी ट्विट करीत मालमत्ता हस्तांतरणाच्या कारवाईची माहिती जाहीर केली. तिघा फरार कर्जबुडव्या व्यावसायिकांची 9371.17 कोटींची मालमत्ता बँकांकडे हस्तांतरित केल्यामुळे बँकांना या मालमत्तांचा लिलाव करता येईल. तसेच घोटाळय़ात झालेल्या नुकसानीची या माध्यमातून भरपाई करता येणार आहे. तिघांच्या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये 969 कोटींची मालमत्ता परदेशातील आहे. आतापर्यंत जप्त केलेली मालमत्ता बँकांच्या झालेल्या एकूण नुकसानीच्या तुलनेत 80.45 टक्के आहे. या घोटाळेखोरांनी बहुतांश मालमत्ता कुठली तरी बनावट कंपनी, त्रयस्थ व्यक्ती किंवा ट्रस्टच्या नावावर ठेवली होती, अशी माहिती ईडीच्या तपासात पुढे आली.

n ईडीच्या म्हणण्यानुसार, आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्यांतर्गत चौकशीनंतर मल्ल्या, नीरव मोदी आणि चोक्सीविरोधात फौजदारी तक्रार केली आहे. या तिघांच्या प्रत्यार्पणासाठी युनायटेड किंगडम, एंटिग्वा आणि बारबुडामध्ये अर्ज केला आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने आदेश दिला होता. तो आदेश लंडनच्या उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. तसेच मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे त्याचे हिंदुस्थानातील प्रत्यार्पण निश्चित झाले आहे.

कोणावर काय आरोप?

कुख्यात हिरे व्यापारी नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोघांनी पंजाब नॅशनल बँकेतील अधिकाऱयांशी संगनमत करून तब्बल 13,500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. दुसरीकडे कुख्यात मद्य उद्योजक विजय मल्ल्याने 9 हजार कोटींचा कर्ज घोटाळा तसेच बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे.

आपली प्रतिक्रिया द्या