दिल्ली डायरी : ‘सत्तेचे हलाहल’ आणि  कुमारस्वामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी 

आघाडी धर्माचे पालन करत सरकार चालविणे म्हणजे हलाहल पचविणे. मात्र हे ‘हलाहल’ पचवून ‘विषेकंठीकाळा’ झालेल्या शिवशंभोसारखी माझी अवस्था झाली आहे’’ असे सांगत मध्यंतरी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. काही महिन्यांच्या काँग्रेसच्या संगतीने कुमारस्वामींच्या हृदयाला इंगळ्या डसल्या की काँग्रेसशी ‘नाता तोडो’ यासाठी दिल्लीवरून दबाव आल्यामुळे कुमारस्वामींच्या डोळ्यांतून अश्रू असतील याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सत्तेचे हलाहल कुमारस्वामी कसे पचवतात याचे उत्तर भविष्यातच मिळेल.

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मध्यंतरी आघाडी सरकारमुळे होत असलेल्या कोंडीबद्दल जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली. एवढेच नव्हे तर हे सत्तेचे हलाहल पचवणे आपल्यासाठी कसे अवघड ठरले आहे असे सांगत ते लोकांसमोर अक्षरशः रडले. त्यांचा पक्ष आणि काँग्रेस यांच्या आघाडी सरकारला काहीच महिने झाले आहेत. तरीही कुमारस्वामींवर रडण्याची वेळ आली. यावरून तेथील राजकारणात सगळे आलबेल नाही हे दिसून येते.

कर्नाटकात येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदी साम-दाम-दंड-भेद अशा सर्वांचा वापर करून बसवायचेच असा विडा भाजपाध्यक्षांनी उचलला होता. तो पूर्णत्वास जाईल अशीही चिन्हे होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला. बहुमताचे लाइव्ह टेलिकास्ट होणार असल्याने ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नाइलाज झाला आणि अनपेक्षितपणे कुमारस्वामींच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची वरमाला पडली. मात्र कुमारस्वामी आणि काँग्रेस आघाडीचे आघाडी सरकार आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पाडून कुमारस्वामींच्या हाती कमळ देण्याचा विडा भाजप नेतृत्वाने उचलला आहे. या दबाव तंत्रामुळेच कुमारस्वामींना अवघ्या दोनेक महिन्यांत काँग्रेसची साथ ‘नकोशी’ वाटू लागली आहे.

दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीवेळी भाजपाई मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे टाळून पंतप्रधानांनी कुमारस्वामींशी बराच वेळ गुलूगुलू केल्याने त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जात आहेत. संधी मिळेल तिथे पंतप्रधान मोदी हे माजी पंतप्रधान देवगौडा यांचे कौतुक करत असतात. संसदेतील विश्वासदर्शक ठरावावेळीही मोदींनी ‘‘देवेगौडांच्या सत्तेचे जाजम काँग्रेसने कसे एका रात्रीत ओढले होते’’ हे सांगत देवेगौडांच्या नाजूक दुःखावर फुंकर मारली आहे. त्यामुळे सद्गदित झालेले देवेगौडा उतारवयात काँग्रेसचा हिशेब चुकता करतात काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सत्तेच्या विषाचा प्याला भल्याभल्यांना पचवता येत नाही. मुख्यमंत्री कुमारस्वामी सध्या त्याचीच अनुभूती घेत आहेत.

जीतेंद्र रेड्डी को गुस्सा क्यों आता है?

जीतेंद्र रेड्डी हे तेलंगणा राष्ट्र समितीचे लोकसभेतील गटनेते आहेत. दाक्षिणात्य असूनही रेड्डी हे उत्तम हिंदीत बोलतात. त्यामुळे त्यांनी आपली एक इमेज तयार केली आहे. रेड्डी संसदेच्या खाद्यविषयक समितीचे चेअरमन आहेत. संसद अधिवेशनाच्या आदल्या दिवशी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत सरकारकडून खिलवण्यात आलेल्या स्नॅक्समुळे सध्या रेड्डी महाशयांचा पारा भलताच चढला आहे. संसदेच्या कॅण्टीनमध्ये खाद्यपदार्थ कसे कमी किमतीत मिळतात, खासदारांना तर सगळे काही फुकटच मिळते असा अपप्रचार सोशल मीडियावर नेहमीच होताना दिसतो. मुळात संसदेत भोजन करणारे खासदार संख्येने खूपच नगण्य आहेत. संसदेच्या कॅण्टीनमधील अन्नपदार्थांच्या दर्जावरून यापूर्वीही अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. मात्र यावेळी मुद्दा होता तो स्नॅक्स बाहेरून एका प्रतिष्ठत साऊथ इंडियन फूड चेनकडून मागविण्याचा.

संसदेचे मान्सून अधिवेशन सुरळीतपणे पार पाडूया असे आवाहन करत मायबाप सरकारने सर्वक्षीय नेत्यांना हा खास बाहेरून मागवलेला दाक्षिणात्य पाहुणचार केला. अर्थात बाहेरचे पदार्थ असल्यामुळे चटकदार असणे साहजिकच होते. मग इडली, उत्तपा, मसाला डोसा, सांबरवडा, अशा दाक्षिणात्य पदार्थांवर सर्वपक्षीय मंडळी पक्षीय मतभेद विसरून तुटून पडली. तृप्तीचा ढेकर दिल्यानंतर आपल्या कॅण्टीनमध्ये एवढे चवदार पदार्थ कधीपासून मिळायला सुरुवात झाली अशी पृच्छा एका नेत्याने केली. त्यावेळी संबंधित कर्मचार्‍याने ‘‘साहब, बाहर से ऑर्डर किया है’’ असे सांगितल्यावर इडलीवर यथेच्छ ताव मारलेल्या जीतेंद्र रेड्डींमधला ‘खाद्य कमिटीचा चेअरमन’ अचानक ‘जागा’ झाला. संसदेचे कॅण्टीन असताना बाहेरून पदार्थ मागवणे अयोग्य असल्याचे रेड्डींनी ठणकावून सांगितले. त्यामुळे संसदेचे कॅण्टीन चांगले नाही असा मेसेज जाईल असे त्यांचे म्हणणे पडले.

विश्वासदर्शक ठरावावेळी अण्णा द्रमुकच्या खासदारांची होणारी संभाव्य मदत लक्षात घेऊन त्यांचा ‘मूड’ राखण्यासाठी संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमारांनी ही साऊथ इंडियन स्नॅक्सची टूम काढली. या पदार्थांवर ताव सगळ्यांनीच मारला. मात्र जीतेंद्र रेड्डींनी हात पुसत पुसत ही मेजवानी ‘बेचव’ करून टाकली हेच खरे !

भूपेंद्र यादवांना अच्छे दिन

भाजपमध्ये कधी कोणाला ‘अच्छे दिन’ येतील याचा भरवसा नाही. पूर्वअट एवढीच की, तुमची थेट पंतप्रधान मोदी किंवा अमित शहा यांच्याशी ओळख हवी. मोदी पूर्णवेळ प्रचारक असताना त्यांचे मित्र असल्याची पुण्याई मनोहरलाल खट्टर यांच्या कामी आली आणि ते हरयाणाचे मुख्यमंत्री झाले असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. तीच गत भूपेंद्र यादवांची. अगदी दोनेक वर्षांपूर्वी हे नाव कोणाच्या खिजगणतीत नव्हते. सुप्रीम कोर्टात अरुण जेटलींच्या टीममध्ये काम करणारा एक वकील अशी त्यांची ओळख होती. मात्र जेटलींसह राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजेंच्या गुड बुकमध्ये हे यादव कधी जाऊन बसले ते कोणाला उमगले नाही.

सध्या हेच यादव अमित शहा यांना राज्यसभेत जाता येता गाडीपर्यंत सोडताना दिसतात. पक्षाचे सरचिटणीस असलेल्या या यादवांकडे विश्वासदर्शक ठरावावेळी मतदान कसे करावे याचे प्रशिक्षण महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या भाजप खासदारांना देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. भूपेंद्र यादव महाराष्ट्र सदनात आले तेव्हा रिसेप्शनच्या ठिकाणी भाजपचा राजीनामा देऊन भंडारा – गोंदियातून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याची किमया करणारे माजी खासदार नाना पटोले उपस्थित होते. यादवांनी थेट नानांनाच गाठले. नमस्कार चमत्कार झाल्यावर यादवांनी नानांचा हात धरून त्यांना बैठकीसाठी नेण्याचा प्रयत्न केला. नानांनी भाजपचा ‘हात’ कधीच सोडला होता हे यादवांच्या लक्षातच आले नाही. अखेर न राहवून नाना पटोलेंनी आपली ‘ओळख’ करून दिली. ‘आपके बीजेपी वालों की मीटिंग उधर हे’ असे सांगून यादवांच्या कचाट्यातून हात सोडवून घेतला. नंतर भूपेंद्र यादव चांगलेच वरमले, तर दुसरीकडे भाजपवाल्यांच्या तावडीतून दुसर्‍यांदा सुखरूप सुटलो असे भाव नाना पटोलेंच्या चेहर्‍यावर झळकले नसते तरच नवल!

[email protected]