
>> ज्ञानेश्वर भि. गावडे
पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ होत असल्यामुळे केंद्र सरकार चिंताग्रस्त झालेले आहे. तेल उत्पादक व निर्यातदार देश (ओपेक) लागणार्या तेलाच्या ८३ टक्के कच्चे तेल हिंदुस्थानला पुरवत आहेत. म्हणूनच ओपेकला पर्यायी मार्ग देशाला शोधावाच लागेल. लवकरच अमेरिका कच्च्या तेलाच्या उत्पादनात व विक्रीत जगात सर्वात मोठा मालदार बनण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेला त्यांच्या जवळच्या समुद्रात अफाट तेलसाठा सापडलेला आहे. नव्या वैज्ञानिक तंत्रकौशल्याने अमेरिका प्रचंड प्रमाणात आणि अव्याहतपणे कच्च्या तेलाचे उत्पादन करण्याची शक्यता आहे. त्याचा अधिकतम फायदा जगात सर्वात जास्त इंधन तेल आयात करणार्या हिंदुस्थानने घेतलाच पाहिजे.
तेलाच्या आयातीवर निरनिराळ्या मार्गाने व वेगवेगळ्या पद्धतीने आयात शुल्क व अधिभाराच्या रूपाने केंद्र सरकार हिंदुस्थानी जनतेला लुटत आहे. या लूटमारीला सरकारनेच स्वेच्छेने कमी करून वाढत्या महागाईवर नियंत्रण आणावे. अमेरिकेबरोबरच कच्चे तेल चीनकडून मिळण्याची शक्यता आहे. त्याही दृष्टीने हिंदुस्थानने प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर इंधन तेलाची बचत होईल असे सर्वच ज्ञात व अज्ञात मार्ग शोधले पाहिजेत. कारण इंधन तेलाच्या वाढत्या किमती जनतेच्या असंतोषाची आग भडकवीत आहेत आणि आपल्याकडील रुपया हे दुबळे चलन प्रथम डॉलर्स खरेदीवर खर्च होते व त्यानंतर ते डॉलर्स घेऊन आयात होणार्या कच्च्या तेलावर खर्ची पडते. त्यामुळे देशाची व्यापारी तूट वाढतच जाते ती काही टाळता येत नाही. इंधन तेलाच्या वाढत्या किमतीमुळे महागाई जनतेचा संताप वाढवीत आहे. त्याचा सर्वांनीच गंभीर विचार करावा.




























































