
शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या शैक्षणिक दिनदर्शिकेमुळे राज्यभर शिक्षकांचा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. या दिनदर्शिकेत पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम एकसारखाच छापण्यात आला होता. ही ‘प्रिंटींग मिस्टेक’ लक्षात येईपर्यंत दिनदर्शिका राज्यातील शिक्षकांपर्यत पोहोचली. त्यानंतर दुसरीच्या अभ्यासक्रमात दुरुस्ती करून सुधारित दिनदर्शिकेची पीडीएफ कॉपी प्रसिद्ध करण्यात आली. पण या कॉपीविषयी राज्यातील बहुसंख्य शिक्षकांना माहितीच नसल्याचे त्यांच्याशी संपर्क साधल्यावर उघडकीस आले.
कोरोना संसर्गामुळे राज्यभरातील शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धती राबवली जात आहे. शाळा सुरू होईपर्यंत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने जून ते ऑगस्ट महिन्यांसाठी पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार केला असून तो शैक्षणिक दिनदर्शिकेद्वारे गेल्याच आठवडय़ात प्रसिद्ध केला आहे.
सुधारित दिनदर्शिका कधी आली
निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या अलिबाग, तळा, रोहा, कोलाड भागातील जिल्हा परिषद शिक्षकांकडे पहिली दुसरीचा एकसारखाच अभ्यासक्रम असलेली दिनदर्शिका आहे. शिक्षण विभागाने काढलेल्या सुधारित दिनदर्शिकेविषयी या शिक्षकांना माहीती नव्हते. वेबसाइट ओपन होण्यास नेटवर्कचा प्रोब्लेम असल्याने व्हॉट्पॅसवर इतर शिक्षकांकडे विचारणा करून या शिक्षकांनी दिनदर्शिका मिळवली.
वेगळी फाईल अपलोड झाली
शैक्षणिक दिनदर्शिकेत पहिली आणि दुसरीचा एकसारखा अभ्यासक्रम दिलेला नसल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक विकास गरड यांनी सांगितले. सुरूवातीला वेगळी फाईल अपलोड झाली होती. मात्र नंतर लगेचच नवी फाईल वेबसाइटवर अपलोड केल्याचे गरड यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांचा बेजबाबदारपणा
शाळा सुरू नसल्याने राज्यातील ग्रामीण भागातील काही शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण गांभीर्याने घेतलेले नाही. शिक्षकांकडे शैक्षणिक दिनदर्शिकेविषयी विचारणा केली असता त्यांनी याविषयी काही माहिती नसल्याचे सांगितले तर काहींच्या व्हॉट्सऍपवरील शिक्षकांच्या ग्रुपवर पीडीएफ कॉपी आली आहे. मात्र अद्याप ती ओपनच केली नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. www.maa.ac.in या वेबसाइटवर ही दिनदर्शिका उपलब्ध आहे तसेच दिक्षा ऍपवरूनही दिनदर्शिका डाऊनलोड करून घेता येते पण बऱयाच शिक्षकांनी त्यासाठी तसदी घेतलेली नाही.





























































