
‘तौकते’ येऊन गेले, पण मागे ठेवून गेले अनेक जखमा. या चक्रीवादळाने पाच राज्यांत 23 बळी घेतले. कोकणसह मुंबई-ठाण्याला पार झोडपून काढले. कोकणात या वादळाने तब्बल एक हजार कोटींचे नुकसान केले, तर मुंबईत 2364 झाडे उन्मळून पडली.किनाऱयावरील अनेक बोटींचा चक्काचूर झाला. राज्यातील 6 हजारांपेक्षा अधिक गावांना या वादळाचा जबर फटका बसला. घरांचे नुकसान झाले, फळबागा उद्ध्वस्त झाल्या. ठाणे, पालघर, रायगडमध्ये तर तीस तास ब्लॅकआऊट होता.
मागील वर्षीच्या ‘निसर्ग’ चक्रीवादळापेक्षा ‘तौकते’ चक्रीवादळाने कोकणातील किनारपट्टीच्या भागाला जबरदस्त तडाखा दिला आहे. या वादळामध्ये एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये कोकणातील आंबा व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यापुढे आर्थिक संकट असले तरी वादळग्रस्त कोकणवासीयांच्या मागे महाविकास आघाडीचे सरकार ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दै. ‘सामना’शी बोलताना दिली.‘तौकते’ चक्रीवादळानंतर कोकणवासीयांना तातडीने मदत देण्याबरोबरच इतर उपाययोजनांच्या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी नुकसानग्रस्त सात जिह्यांतील जिल्हाधिकारी व सचिवांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर ठाणे या जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. वादळापूर्वी साडेतेरा हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. विविध दुर्घटनांमध्ये 16 लोक मृत्युमुखी अजून काही जण बेपत्ता आहेत. त्यामुळे हा आकडा वाढू शकतो. काही बोटी बेपत्ता आहेत. त्याची माहिती घेण्याचे काम सुरू झाले. या वादळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची तातडीची मदत दिली जाईल.
शाळा, घर, गोठय़ांचे नुकसान
या वादळात साडेअकरा हजार इमारतींचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. त्यात घर, गोठे, शासकीय इमारती, शाळांचाही समावेश आहे. अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. त्यांना तातडीने पत्रे उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी उद्या बुधवारी होणाऱया राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून हा निधी उपलब्ध करून दिला जाईल.
गावे काळोखात
वादळात 636 गावांमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी तीस ते चाळीस टीम पाठवल्या आहेत. चक्रीवादळाच्या पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी केलेल्या सूचनांचा निश्चितच फायदा झाला. कोविड सेंटरसाठी जनरेटर तयार ठेवण्याची सूचना त्यांनी केली होती. त्यामुळे या जिह्यांमधील कोविड सेंटरमधील वीज पुरवठा खंडित झाला नाही. त्यामुळे रुग्णांची व्यवस्था चांगली झाली. कोविड सेंटर सुरळीत सुरू राहिली.
2 हजार 700 कोटींचा खर्च
या वादळाने वीज पुरवठय़ावर मोठा परिणाम झाला आहे. त्यासाठी विजेच्या वायर भूमिगत टाकाव्या लागतील. त्यासाठी 2 हजार 700 कोटी रुपये खर्च असल्याचे मागील ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या वेळेस लक्षात आले. तीन-चार वर्षांत हा निधी उपलब्ध केल्यास वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर कायम उपाय योजता येईल.
‘तौकते’चा जबदरस्त तडाखा
‘निसर्ग’ चक्रीवादळापेक्षा ‘तौकते’ चक्रीवादळाने अधिक तडाखा दिला आहे. कोकण व किनारपट्टीच्या भागाचे एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा आकडा कदाचित वाढेल. ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना 700 कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत केली होती.
वाऱयावर सोडणार नाही
या वादळात कोकणवासीयांचे भात व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यापुढे आर्थिक संकट असले तरी सरकार कोकणवासीयांना वाऱयावर सोडणार नाही. त्याच्यासाठी आवश्यक निधी उभारावा लागेल ही महाविकास आघाडीची भूमिका आहे.
‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना निकषांच्या बाहेर जाऊन राज्य सरकारने मदत केली होती. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे फळबागांसाठी हेक्टरी 18 हजार रुपये मदत मिळते. पण मागील वेळेस राज्य सरकारने हेक्टरी 50 हजार रुपयांपर्यंत मदत केली होती. आताही तातडीने कॅबिनेटपुढे प्रस्ताव सादर करून कोकणवासीयांना निकषांच्या बाहेर जाऊन मदत देण्याचा प्रयत्न राहील. -विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसनमंत्री

































































