
सामना प्रतिनिधी, मुंबई
देशात लवकरच अंडी आणि मटण महागणार आहे. कुक्कुटपालनाबरोबरच पशुपालन, मत्स्यपालन करणारे शेतकरी पशूंच्या संतुलित वाढीसाठी त्यांना पूरक पशुखाद्य देतात. पण सध्या पशुखाद्य बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या तेलबिया आणि तेलजन्य पदार्थासारख्या कच्च्या मालावर केंद्र सरकारने जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे अंडी आणि मटणाचा उत्पादन खर्च वाढल्याने त्याचा विक्री दर वाढणार असल्याचे ‘दी कंपाऊंड लाइव्हस्टॉक फीड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने स्पष्ट केले आहे.
कुक्कुटपालन, पशुपालनाच्या एकूण खर्चापैकी 70 टक्के खर्च पशुखाद्यावर करावा लागतो, मात्र सरकारच्या निर्णयामुळे पशुखाद्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. जीएसटीच्या रूपाने झालेली ही वाढ पशुखाद्य उत्पादकांच्या मानगुटीवर पडत असून तो भार पुढे शेतकऱयांवर जात आहे. त्यामुळे अंडी आणि मटणाचे दर वाढणार असल्याची भीती असोसिएशनचे अध्यक्ष बी. सौंदरराजन यांनी व्यक्त केली आहे.
देशातील अंडी आणि मटणाच्या किमती वाढल्या तर व्यावसायिकांना जागतिक बाजारपेठेत टिकून राहणे कठीण आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने पशुखाद्य बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या तेलबिया व तेलजन्य पदार्थासारख्या कच्च्या मालावर लावलेला पाच टक्के जीएसटी तत्काळ मागे घेण्याची मागणी सौंदरराजन यांनी केली आहे.
summary- eggs and mutton to get hike due to gst


























































