आठ गिरण्यांमधील कामगारांना गृहयोजनेत सामावून घ्या! गिरणी कामगार कर्मचारीनिवारा-कल्याणकारी संघाची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने गिरणी कामगारांना घराच्या पात्रतेसाठी 1 जानेवारी 1982 ही ‘कट ऑफ डेट’ जाहीर केली आहे. मात्र, मुंबईतील आठ गिरण्यांसाठी 1 ऑक्टोबर 1981 ही ‘कट ऑफ डेट’ करावी, अशी मागणी गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी मंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

बोनसवाढीसाठी मुंबईतील हिंदुस्थान मिल- ए आणि बी, हिंदुस्थान मिल- क्राऊन मिल, हिंदुस्थान मिल – प्रोसेस हाऊस, स्टॅन्डर्ड मिल टेक्सटाईल प्रभादेवी, प्रकाश कॉटन मिल, श्रीनिवास मिल, मधूसुदन मिल या आठ गिरण्यांमधील कामगारांनी ऑक्टोबर 1981 मध्ये दिवाळीच्या दरम्यान संप पुकारला. या आठ गिरण्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील इतर गिरणी कामगारांनी 18 जानेवारी 1982 रोजी लाक्षणिक संप पुकारला.या आठ गिरण्यांतील कामगारांच्या कामाच्या दाखल्यावर ऑक्टोबर 1981 ही काम केल्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या मिलमधील गिरणी कामगार अर्ज भरण्यापासून वंचित राहिले आहेत. या उद्ध्वस्त गिरणी कामगारांच्या समस्येवर तोडगा काढून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेचे चिटणीस हेमंत राऊळ यांनी केली आहे.

बृहन्मुंबईतील 58 बंद पडलेल्या गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण दीड लाख गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी सुरू असलेल्या अभियानाला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत 1 लाख 10 हजारांहून अधिक गिरणी कामगार आणि वारसांनी घरासाठी अर्ज केले आहेत.