
कोरोनामुळे मागील वर्षभरापासून घरातूनच ऑनलाइन शाळांना हजेरी लावणाऱया विद्यार्थी, पालकांना आता शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने कालपासून सुरू केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत 85 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास तयारी दर्शविली आहे.
शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोरोनामुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यासह इतर इयत्तांच्या शाळा कधी सुरू होणार, असा प्रश्नही समोर येत होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व पालक, शिक्षक यांच्याकडून शाळा सुरू करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेतले आहे. सदर सर्वेक्षण सोमवार, 12 जुलै रात्री 11.55 पर्यंत सुरू राहणार आहे. राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी यांनी पालकांना सदर सर्वेक्षणात आपले मत नोंदविण्याचे आवाहन परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी केले आहे.
पालकांना विविध प्रश्न विचारून शाळा सुरू करण्याबाबत त्यांचे मत जाणून घेतले जाणार आहे. यामध्ये शाळा कोणत्या भागात येते, तेथील कोरोनाची परिस्थिती, पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यास तयार आहेत का याबाबतची माहिती घेतली जाणार आहे.
कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा 15 जुलैपासून सुरू करण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली असून ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ठरावाने शाळांबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे.
ग्रामीण भागात सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असून पालकांच्या सूचना, अभिप्रायदेखील महत्त्वाचा असणार आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सर्वेक्षणाची लिंक दिली असून http://www.maa.ac.in/survey या लिंकवर जाऊन पालकांनी शाळा सुरू करण्याबाबत अभिप्राय नोंदवायचा आहे.
सर्वेक्षणाची आकडेवारी अशी
- आतापर्यंत एकूण 2,25,194 पालकांनी आपले मत नोंदविले आहे.
- यात ग्रामीण भागातून 1,18,182 म्हणजेच 52.48% पालक
- निमशहरी भागातून 23,948 म्हणजेच 10.63% पालक
- शहरी भागातून 83,064 म्हणजेच 36.89% पालक
- यात शाळेत पाठवायला तयार असणारे 1,89,095 म्हणजेच 83.97% पालक
- शाळेत पाठवायला इच्छुक नसणारे 36,099 म्हणजेच 16.03% पालक
कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग 15 जुलैपासून सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इतर इयत्तांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातही पालकवर्गातून विचारणा होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व पालक, शिक्षक यांचे शाळा सुरू करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेतले असून आतापर्यंत 85 टक्के पालकांनी पाल्याला शाळेत पाठविण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. सदर सर्वेक्षण सोमवार, 12 जुलै रात्री 11.55 पर्यंत सुरू राहणार आहे.

































































