
जुन्नर तालुक्यातील माळीण गावात मुसळधार पावसामुळे 2014 मध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे जीवित आणि मालमत्तेची हानी झाली होती. संपूर्ण गावच एका रात्रीत नाहीसं झालं होतं. या भीषण दुर्घटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ हा चित्रपट 29 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर येत आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार संहिता हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. ड्रीम डॉट क्रिएशनच्या संतोष म्हात्रे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजू राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी चित्रपटाचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, दीपज्योती नाईक यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी माळीणमधील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांच्याकडून माहिती घेऊन कथानक लिहिलं गेलं आहे.

























































